अपघात रोखण्यासाठी जळगाव पोलिसांची कडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या वाहनांवर विशेष पथकांची नजर.
जळगाव : रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जळगाव शहर वाहतूक शाखेकडून मोठी कारवाई करण्यात आली असून कर्कश आवाज करणारे दुचाकी सायलेन्सर आणि अवैध फॅन्सी नंबर प्लेटवर कठोर पावले उचलण्यात आली आहेत. सन २०२६ मध्ये राबविण्यात आलेल्या या मोहिमेत वाहतूक पोलिसांनी शहरातील वाहनांची तपासणी केली असता सुमारे १०० दुचाकींवर कंपनीकडून नसलेले कर्कश आवाज करणारे सायलेन्सर बसविण्यात आल्याचे आढळून आले.
हे सायलेन्सर दुचाकी खरेदी केल्यानंतर बाहेरून बसविण्यात आले असून त्यातून होणाऱ्या तीव्र आवाजामुळे स्थानिक रहिवासी, ज्येष्ठ नागरिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांना मोठा त्रास होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये या उद्देशाने वाहतूक पोलिसांनी हे सायलेन्सर जप्त केले.
याचबरोबर शहरात अवैधरित्या फॅन्सी नंबर प्लेट लावून फिरणाऱ्या दुचाकीस्वारांवरही कारवाई करण्यात आली. अशा सुमारे २५० नंबर प्लेट जप्त करण्यात आल्या होत्या. मा. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार या सर्व जप्त केलेल्या सायलेन्सर व नंबर प्लेट रोड रोलरच्या सहाय्याने चेपून निकामी करण्यात आल्या.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई अधिक महत्त्वाची ठरत आहे. सन २०२५ मध्ये जिल्ह्यात एकूण ९३९ रस्ते अपघात झाले असून त्यापैकी ४५० अपघात प्राणांतिक होते. या अपघातांमध्ये सुमारे ४८७ जणांचा मृत्यू झाला आहे. या गंभीर परिस्थितीला आळा घालण्यासाठी वाहतूक विभागाने कठोर उपाययोजना सुरू केल्या आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके नेमून विना हेल्मेट वाहन चालविणे, ट्रिपल सीट, अल्पवयीन चालक, रॅश ड्रायव्हिंग, बेशिस्त वाहन चालविणे, नो पार्किंग उल्लंघन, अवैध प्रवासी वाहतूक, मद्यप्राशन करून वाहन चालविणे, राँग साईडने वाहन चालविणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे तसेच कर्कश सायलेन्सर यांसारख्या नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात येत आहे.
ही विशेष मोहीम पुढेही नियमितपणे आणि अधिक तीव्रतेने राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून कारवाई टाळावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
तसेच जळगाव जिल्हा ‘शून्य प्राणहानी जिल्हा’ करण्याच्या उद्देशाने रस्ता सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली असून जनजागृती आणि कठोर कारवाईच्या माध्यमातून अपघातांचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
