दीर्घ कायदेशीर लढाईनंतर ललित कोल्हे यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; जामीन मंजूर झाल्याने सुटकेचा मार्ग मोकळा.
जळगाव : बनावट कॉल सेंटर प्रकरणात अटकेत असलेले जळगावचे माजी महापौर ललित कोल्हे यांना आज सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर करत मोठा दिलासा दिला. प्रदीर्घ काळ चाललेल्या कायदेशीर लढाईनंतर हा निर्णय आला असून, त्यांच्या सुटकेचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
ममुराबाद रोडवरील ‘एल. के. फार्म’ येथे काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी धाड टाकून बनावट कॉल सेंटर उघडकीस आणले होते. या ठिकाणी विदेशी नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात जागेचे मालक म्हणून ललित कोल्हे यांच्यासह इतर संशयितांना अटक करण्यात आली होती.
अटकेनंतर कोल्हे यांनी जामिनासाठी प्रथम जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला होता, मात्र तो फेटाळण्यात आला. त्यानंतर उच्च न्यायालयातही त्यांनी दाद मागितली होती, पण तेथेही त्यांना दिलासा मिळाला नव्हता. अखेरीस त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आज त्यांना जामीन मंजूर केला.
दरम्यान, जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत कोल्हे यांनी कारागृहात असतानाच उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक लढवली होती आणि त्यात विजयही मिळवला होता. त्यामुळे त्यांच्या जामिनाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते.
या निर्णयानंतर कोल्हे समर्थकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील न्यायालयीन प्रक्रियेवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
