ठाणे जिल्ह्यात भेसळखोरी आणि गुटखा विरोधातील कारवाईला वेग आला असून मुंब्र्यातील छाप्यानंतर ‘पोपट पान’मध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकांच्या चौकशीची मागणी वाढली आहे.
राज्यात भेसळखोरी आणि गुटखा विरोधात अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने सुरू केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर मुंब्रा परिसरात पान शॉपवर धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर ठाण्यातील ‘पोपट पान’ पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे.
एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली भेसळयुक्त अन्नपदार्थ तसेच प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्यांविरोधात राज्यभर कारवाई सुरू आहे. या मोहिमेमुळे अशा अवैध व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
मुंब्रा येथील एका मोठ्या गृहसंकुलातील कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या ‘फेमस पान शॉप’वर एफडीए पथकाने डायघर पोलिसांच्या मदतीने छापा टाकला. तपासणीत राज्यात प्रतिबंधित असलेला पानमसाला व सुगंधित तंबाखूचा मोठा साठा आढळून आला. या प्रकरणी दुकानमालक आसिफ आरिफ शेख (वय ४८) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
या कारवाईनंतर ठाण्यात विविध भागांमध्ये विक्री होणाऱ्या ‘पोपट पान’ संदर्भातील वाद पुन्हा समोर आला आहे. कोठारी कंपाऊंड, सिद्धांचल, लोकपुरम, वसंत विहार आणि पवारनगर परिसरात या पानाची विक्री होत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही करण्यात आल्या होत्या. ठाणे महापालिकेच्या सभेतही हा मुद्दा गाजला होता, ज्यामध्ये या पानात अमली पदार्थ मिसळले जात असल्याचा संशय नगरसेवकांनी व्यक्त केला होता.
यापूर्वी ठाणे पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती; मात्र पानातील भेसळ निश्चितपणे तपासणे कठीण ठरत असल्याने कारवाईला मर्यादा आल्या होत्या. आता एफडीएच्या नव्या कारवाईमुळे हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून ‘पोपट पान’मध्ये नेमके कोणते घटक वापरले जातात, याबाबत सखोल तपास करण्याची मागणी वाढत आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
