अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात नागपूर आणि अमरावतीत हजारोंचा सहभाग. ३० जूनला मुंबईतील विधानभवनावर संयुक्त महामोर्चाची घोषणा.
अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी समितीतर्फे शनिवार, २० जून रोजी अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात नागपुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राज्यभरातून मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले. विविध संघटनांनी एकत्र येऊन काढलेल्या या मोर्चात घोषणाबाजी करीत सरकारला इशारा दिला.
सामाजिक एकतेला सरकारकडून सुरूंग
दीक्षाभूमीहून दुपारी ४ वाजता मोर्चाला सुरुवात झाली. अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केल्यानंतर दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून मोर्चा सुरू झाला. अनुसूचित जाती संवर्गात ५९ जाती आहे . ‘अ, ब, क, ड’ अशी गटवारी करणे हे केवळ घटनात्मक प्रश्न नसून सामाजिक एकतेला सुरुंग लावण्याचे सरकारचे धोरण आहे. तसे षडयंत्र रचले गेले आहेत, असा आरोप यावेळी करण्यात आला. बदर समितीचा अहवाल सार्वजनिक होण्यापूर्वीच त्यावर आक्षेप मागविले गेले. राज्याच्या इतिहासात अशाप्रकारे सार्वजनिक व मंजूरी न मिळालेल्या अहवालावर आक्षेप मागविण्याचा प्रकार सरकारने केला. पावसाळी अधिवेशनात हा अहवाल मांडून तो मंजूर करण्याची घाईही सरकारला झाल्याचे दिसून येते. यावरून सरकारची मानसिकता स्पष्ट होत असून, अनुसूचीत जातींमध्ये भांडणे लावण्याची नामी संधी त्यांनी शोधून काढली. मात्र, ही कुटील निती यशस्वी होणार नाही, अशी टीकाही यावेळी करण्यात आली.
सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
संविधानाचा विजय असो, उपवर्गीकर होऊ देणार नाही, आरक्षण आमच्या हक्काचे, आरक्षण विरोधी सरकार मुर्दाबाद, अशा घोषणा ही देण्यात आल्या. या मोर्चात अनुसूचित जातीचे नेतृत्त्व करीत असलेल्या अनेक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सामान्य नागरिकही महापुरुषांचे फलक घेऊन सामिल झाले. त्यामुळे या मोर्चाला विराट स्वरुप आले. परिणामी काही भागात वाहतूकही विस्कळीत झाली होती. समितीचे अमन कांबळे, ॲड. आकाश मून, तक्षशीला वागधरे, ॲड. स्मिता कांबळे, प्रीतम बुलकुंडे, उषा बौद्ध यांच्या सह मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी उपस्थित होते.
अमरावतीतही मोर्चा
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात महाराष्ट्रातील ५९ जातींचा संयुक्त भव्य महामोर्चा १७ जून रोजी अमरावती येथेही काढण्यात आला होता. आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती, अमरावतीच्या वतीने काढण्यात आलेल्या या मोर्चातही हजारो नागरिकांनी हजेरी लावली होती. संविधान आणि आरक्षणाच्या संरक्षणासाठी एकजूट दाखविण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना, कर्मचारी संघटना, युवक संघटना, महिला संघटना, बुद्ध विहार या मोर्चात सहभागी झाले होते. याशिवाय विविध संघटनांनी ३० जून रोजी मुंबईत विधानभवनावर संयुक्त महामोर्चा काढण्याचे निश्चित केले आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
