भुसावळ तालुक्यातील फेकरी येथील घरकुल लाभार्थ्यांनी मंजुरीनंतरही काम सुरू न झाल्याने न्यायासाठी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे.
घरकुल मंजुरीचे आदेश मिळून १० महिने उलटले तरी बांधकाम सुरू न झाल्याने बेघर झालेल्या भुसावळ तालुक्यातील फेकरी येथील लाभार्थ्यांनी आज, सोमवार (दि. २२ जून) पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. जळगावात सध्या जोरदार पाऊस सुरू असून, अंगावर पडणाऱ्या भरपावसातही हे हक्काच्या घरासाठी आंदोलन सुरू असल्याने प्रशासकीय यंत्रणेच्या संवेदनशीलतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सौ. नीता राजू सोनवणे व अन्य लाभार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात प्रशासकीय निष्क्रियतेचा पाढा वाचला आहे. निवेदनानुसार, ११ ऑगस्ट २०२५ रोजी लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे अधिकृत आदेश प्राप्त झाले होते. शासनाच्या सूचनांचे पालन करत लाभार्थ्यांनी आपली राहती जुनी घरे पाडून टाकली. मात्र, या घटनेला तब्बल दहा महिने उलटून गेले तरी अद्याप प्रत्यक्ष घरकुल बांधकामास सुरुवात झालेली नाही. स्वतःचे घर पाडल्यामुळे या गरीब कुटुंबांवर सध्या भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली असून, त्यांना प्रचंड आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
वारंवार पाठपुरावा करूनही दखल नाहीया गंभीर प्रकरणी लाभार्थ्यांनी ८ मे २०२६ रोजी ऑनलाईन अर्ज सादर केला होता. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक वेळा प्रत्यक्ष फेऱ्या मारूनही त्याची कोणतीही दखल घेतली गेली नाही, असा आरोप लाभार्थ्यांनी केला आहे. त्यानंतर २२ मे रोजी पुन्हा निवेदन देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद, जळगाव) तसेच इतर संबंधित विभागांकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.
पंचायत समितीकडून टोलवाटोलवी:
पावसातही ठिय्याभुसावळ पंचायत समितीच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणताही समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर न्याय मिळवण्यासाठी आमरण उपोषणाचा अंतिम मार्ग स्वीकारावा लागल्याचे आंदोलकांनी सांगितले. एकीकडे मान्सूनचा पाऊस कोसळत असताना, दुसरीकडे छप्पर नसलेले हे बेघर लाभार्थी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पावसात भिजत उपोषणाला बसले आहेत. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून घरकुलाचे काम सुरू करून द्यावे, अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
या आमरण उपोषणात सौ. नीता राजू सोनवणे, अरुणा दाभाडे, सुरेखा गागाराम अठवले, रेखा प्रशांत गुरचळ, अलका सुनील रायमोळे यांच्यासह इतर त्रस्त लाभार्थी भरपावसात सहभागी झाले आहेत.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
