बेघर, अनाथ आणि मनोरुग्णांसाठी ‘आत्मसन्मान’चा आशेचा प्रकल्प; बोडवडमध्ये २.४० कोटींचे पुनर्वसन केंद्र उभारण्याची तयारी

आत्मसन्मान फाउंडेशनतर्फे बोडवड येथे बेघर, अनाथ, निराधार आणि मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्तींसाठी २.४० कोटी रुपयांच्या खर्चातून अत्याधुनिक पुनर्वसन केंद्र उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

बेघर, निराधार आणि मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्तींसाठी बोडवड येथे अत्याधुनिक पुनर्वसन केंद्र उभारण्याची तयारी सुरू आहे. आत्मसन्मान फाउंडेशनच्या या प्रकल्पाचा अंदाजित खर्च २.४० कोटी रुपये आहे.

 जळगाव जिल्ह्यातील बोडवड येथे बेघर, अनाथ, निराधार आणि मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्तींना सुरक्षित निवारा, उपचार आणि सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आत्मसन्मान फाउंडेशनतर्फे ‘प्रमिलाई व मोहनराव परिवार मनोरुग्ण पुनर्वसन केंद्र’ उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. सुमारे २.४० कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून, समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्थांच्या सहकार्याने तो साकार करण्याचे उद्दिष्ट फाउंडेशनने ठेवले आहे.

फाउंडेशनच्या माहितीनुसार, प्रस्तावित पुनर्वसन केंद्रासाठी बोडवड येथे सुमारे ६० हजार चौरस फूट (१.३८ एकर) जागा निश्चित करण्यात आली आहे. या प्रकल्पात एकूण १७ हजार चौरस फूट बांधकाम प्रस्तावित असून, मानसिक आरोग्य सेवांसह पुनर्वसनाची सर्वसमावेशक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

टप्प्याटप्प्याने उभारला जाणार प्रकल्प

पुनर्वसन केंद्राचे काम पाच टप्प्यांत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

पहिला टप्पा : जागेचा विकास

  • जागेचे सपाटीकरण
  • वीज जोडणी व पायाभूत सुविधा
  • बोअरवेल उभारणी
  • संरक्षण भिंत बांधकाम
  • वृक्षारोपण व उद्यान विकास
  • आवश्यक कायदेशीर परवानग्या

दुसरा टप्पा : मुख्य बांधकाम

  • प्लिंथ लेव्हलचे बांधकाम
  • भिंती व स्लॅबचे काम
  • फ्लोअरिंग
  • प्लंबिंग व्यवस्था
  • विद्युत वायरिंग

तिसरा टप्पा : अंतर्गत सुविधा

  • दरवाजे, खिडक्या व गेट बसविणे
  • रंगकाम व फिनिशिंग
  • आवश्यक उपकरणांची खरेदी
  • स्वयंपाकघराची उभारणी

चौथा टप्पा : सेवा सुरूवात

  • कर्मचाऱ्यांची नियुक्ती
  • सेवाव्रतींची निवड
  • लाभार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

पाचवा टप्पा : सातत्यपूर्ण विकास

  • गरजेनुसार सुविधांचा विस्तार
  • रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिरिक्त सेवा

पुनर्वसन केंद्रात असणार या सुविधा

प्रकल्पाच्या आराखड्यानुसार केंद्रात पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र निवास व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासोबतच खालील सुविधा उपलब्ध असतील.

  • प्रशासकीय इमारत
  • आरोग्य व समुपदेशन केंद्र
  • व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र
  • सामुदायिक हॉल
  • भोजनालय व सुसज्ज स्वयंपाकघर
  • औषधी वनस्पती उद्यान
  • शेती क्षेत्र
  • स्टोअर रूम व साठवण व्यवस्था
  • सुरक्षित प्रवेशद्वार व सुरक्षा कक्ष

फाउंडेशनच्या मते, या केंद्रात लाभार्थ्यांना केवळ निवारा देण्यावर भर न देता त्यांचे समुपदेशन, उपचार, व्यावसायिक प्रशिक्षण आणि पुनर्वसन करून त्यांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

स्वतंत्र हॉल आणि भोजनालयासाठी देणगीचे आवाहन

प्रकल्पाच्या उभारणीसाठी दानशूर व्यक्ती व संस्थांसाठी विशेष सहकार्य योजना जाहीर करण्यात आली आहे.

संपूर्ण प्रकल्पाचा खर्च उचलणाऱ्या दात्याला प्रकल्पाला आजीवन नाव देण्याची संधी

  • ३० बाय ६० फूट हॉल आणि वॉश एरिया बांधून देणाऱ्या दात्याच्या नावाने हॉलचे नामकरण
  • १ लाख रुपये किंवा त्याहून अधिक देणगी देणाऱ्यांचे नाव मुख्य प्रवेशद्वाराजवळ
  • ५१ हजार रुपये किंवा त्याहून अधिक देणगी देणाऱ्यांचे नाव डायनिंग हॉल परिसरात
  • २१ हजार रुपये किंवा त्याहून अधिक देणगी देणाऱ्यांचे नाव सेवाव्रती निवासस्थानी
  • ११ हजार रुपये किंवा त्याहून अधिक देणगी देणाऱ्यांचा दानकर्ता सन्मान यादीत समावेश
  • ५,००१ रुपये किंवा त्याहून अधिक देणगी देणाऱ्यांच्या नावाने वर्षातून एकदा अन्नदान
  • याशिवाय, वार्षिक अन्नदान सेवेसाठी एका दिवसाचे संपूर्ण पालकत्व ५,१०० रुपये, तर एका वेळच्या भोजनासाठी ३,१०० रुपये निश्चित करण्यात आले आहे.

दोन स्वतंत्र हॉलसाठी २४ लाखांचा अंदाजित खर्च

पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र २,४०० चौरस फूट क्षमतेचे हॉल उभारण्यात येणार आहेत. प्रत्येक हॉलमध्ये स्वतंत्र शौचालय, स्नानगृह, नैसर्गिक हवा व प्रकाश व्यवस्था, तसेच ८० ते १०० लाभार्थ्यांची क्षमता असेल. प्रत्येक हॉलच्या बांधकामासाठी सुमारे २४ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

तसेच २,४०० चौरस फूट डायनिंग हॉल, ६०० चौरस फूट किचन, १०० चौरस फूट स्टोअर आणि २०० चौरस फूट धुण्याची जागा असलेल्या भोजनालयासाठीही सुमारे २४ लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे फाउंडेशनने स्पष्ट केले आहे.

समाजाच्या सहकार्याची अपेक्षा

आत्मसन्मान फाउंडेशनचे पदाधिकारी म्हणाले की, मानसिक आजाराने ग्रस्त, बेघर आणि निराधार व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अशा केंद्रांची मोठी गरज आहे. या प्रकल्पामुळे अनेक गरजू व्यक्तींना सुरक्षित निवारा, उपचार, सन्मान आणि स्वावलंबनाकडे वाटचाल करण्याची संधी मिळणार आहे.

“एक हाताने दिलेले दान हजारो हातांनी परत येते,” असा संदेश देत फाउंडेशनने समाजातील दानशूर नागरिक, उद्योगसमूह आणि संस्थांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

देणगी व अधिक माहितीसाठी आत्मसन्मान फाउंडेशन, बोडवड यांच्याशी ९८९०५३०५३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!