उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील ६ हजार ३५३ पदवी प्रमाणपत्रांचे वाटप होणार; विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळवण्याचे आवाहन

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने प्रलंबित ६,३५३ पदवी प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली असून, अधिकृत संकेतस्थळावरील यादी तपासून आवश्यक कागदपत्रांसह प्रमाणपत्र प्राप्त करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने प्रलंबित पदवी प्रमाणपत्रांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. पुढील शिक्षण व नोकरीसाठी विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्र तातडीने प्राप्त करावे.

 कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे विविध शैक्षणिक वर्षांत उत्तीर्ण झालेल्या, मात्र अद्याप पदवी प्रमाणपत्र न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. विद्यापीठाकडे प्रलंबित असलेली तब्बल ६ हजार ३५३ अवितरीत पदवी प्रमाणपत्रे संबंधित विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.

विद्यापीठाचा ३४ वा दीक्षांत समारंभ २३ डिसेंबर २०२५ रोजी पार पडला. आतापर्यंत झालेल्या विविध दीक्षांत समारंभांनंतर अनेक विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्रे विद्यापीठाकडेच जमा आहेत. यामध्ये टपालाद्वारे पाठविण्यात आलेली, मात्र अपूर्ण किंवा चुकीच्या पत्त्यामुळे परत आलेली प्रमाणपत्रे, अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे न जोडलेली प्रमाणपत्रे, तसेच पात्रतेअभावी किंवा कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे राखून ठेवण्यात आलेल्या प्रमाणपत्रांचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षण, नोकरी आणि विविध शासकीय व खासगी कामांसाठी पदवी प्रमाणपत्राचे महत्त्व लक्षात घेऊन विद्यापीठाने ही प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर ६ हजार ३५३ प्रलंबित पदवी प्रमाणपत्रांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

तसेच सर्व संलग्नित महाविद्यालयांना पत्र पाठवून संबंधित विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता, मात्र अद्याप प्रमाणपत्र प्राप्त केलेले नाही, त्यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आपले नाव तपासावे.

यादीत नाव आढळल्यास विद्यार्थ्यांनी अंतिम वर्षाच्या गुणपत्रिकेची सत्यप्रत आणि ओळखपत्रासह विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्र विभागाशी संपर्क साधून आपले प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. योगेश पाटील यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन आपली पदवी प्रमाणपत्रे वेळेत प्राप्त करून घ्यावीत, असेही विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!