वारकरी परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम घडवत मुक्ताईनगरात ‘सायबर वारकरी’ उपक्रमातून ऑनलाइन फसवणूक, यूपीआय सुरक्षा आणि डिजिटल सुरक्षिततेबाबत नागरिकांना मार्गदर्शन.
आषाढी एकादशीच्या पवित्र सोहळ्यानिमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील स्कूल ऑफ कॉम्प्युटर सायन्सच्या क्विक हील सायबर वॉरियर क्लबतर्फे, क्विक हील फाउंडेशन आणि महाराष्ट्र सायबर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने संत मुक्ताबाई मंदिर परिसरात ‘सायबर वारकरी’ या अनोख्या संकल्पनेवर आधारित सायबर जनजागृती अभियान राबविण्यात आले. वारकरी परंपरेच्या माध्यमातून आधुनिक डिजिटल सुरक्षेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला वारकरी व भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या उपक्रमात स्कूल ऑफ कॉम्प्युटर सायन्समधील २० सायबर वॉरियर्स सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधान करून जनजागृती अधिक आकर्षक बनवली. एका विद्यार्थ्याने भगवान श्री विठ्ठल तर एका विद्यार्थिनीने माता रुक्मिणी यांची वेशभूषा साकारत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. सायबर सुरक्षेचे संदेश असलेले पोस्टर्स, माहितीपर फलक आणि विशेष कॅप्सच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत प्रभावी संदेश पोहोचविण्यात आला. 
आषाढी एकादशीसाठी आलेल्या तीन पालख्यांसमोर विद्यार्थ्यांनी सादर केलेले नृत्य आणि पथनाट्य हे या उपक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, ओटीपी शेअर करण्याचे धोके, बँकिंग व यूपीआय फसवणूक, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर आणि डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाची काळजी यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर या सादरीकरणातून प्रभावी जनजागृती करण्यात आली. प्रबोधनासोबत मनोरंजनाचा समतोल साधणाऱ्या या कार्यक्रमाला नागरिकांनी भरभरून दाद दिली.
कार्यक्रमादरम्यान सायबर वॉरियर्सनी वारकऱ्यांमध्ये जाऊन प्रत्यक्ष संवाद साधला. मोबाईल सुरक्षितपणे वापरणे, संशयास्पद लिंक टाळणे, ओटीपी, पासवर्ड किंवा बँक खात्याची माहिती कोणालाही न देणे तसेच ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी याविषयी त्यांनी सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत मार्गदर्शन केले. अनेक वारकऱ्यांनी आपल्या शंका विचारून त्यांचे समाधान करून घेतले.
उपस्थित वारकरी व भाविकांना “सायबर सेफ कार्ड्स” चेही वितरण करण्यात आले. या कार्ड्समध्ये सायबर सुरक्षेसाठी आवश्यक सूचना, प्रतिबंधात्मक उपाय आणि महत्त्वाचे हेल्पलाईन क्रमांक देण्यात आले होते. अनेकांनी ही माहिती भविष्यातील वापरासाठी जतन करून ठेवत विद्यार्थ्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.
उपक्रम अधिक परिणामकारक करण्यासाठी प्रश्नमंजुषा, छोटेखानी खेळ, संवादात्मक उपक्रम आणि प्रत्यक्ष सहभागावर आधारित विविध कृती आयोजित करण्यात आल्या. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिकांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. त्यामुळे जनजागृतीसोबतच आनंददायी वातावरणही निर्माण झाले.
या अभिनव उपक्रमातून ५०० हून अधिक वारकरी आणि भाविकांपर्यंत सायबर सुरक्षिततेचा संदेश पोहोचविण्यात यश आले. वारकरी संस्कृती आणि सायबर सुरक्षेचा विषय एकत्रितपणे मांडण्याचा हा प्रयत्न अनेकांसाठी विशेष आकर्षणाचा विषय ठरला. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्यासोबत छायाचित्रेही काढली.
परंपरा, संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम साधत समाजात डिजिटल सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्याचा हा उपक्रम यशस्वी ठरला. सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी राबविलेल्या या अभिनव मोहिमेचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात आले असून, भविष्यातही अशाच नाविन्यपूर्ण माध्यमांतून व्यापक सायबर जनजागृती करण्याचा निर्धार क्विक हील सायबर वॉरियर क्लबच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.
✍️ राहुल चोपडे, मुक्ताईनगर – 93221 00208

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
