राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय, पारोळा येथे विद्यार्थ्यांना सायबर फसवणूक झाल्यास 1930 हेल्पलाइन आणि cybercrime.gov.in वर तक्रार करण्याची माहिती देण्यात आली.
डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि त्यासोबत वाढणाऱ्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी पारोळा येथील राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयात विशेष सायबर सुरक्षा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या सत्रात स्वयंसेवक अक्षय पाटील आणि लोकेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना डिजिटल जगतात सुरक्षित राहण्यासाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वंदना पाटील उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्या डॉ. वंदना पाटील यांच्या हस्ते मार्गदर्शकांचे स्वागत करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी आजच्या डिजिटल युगात तरुण पिढीने सायबर सुरक्षेचे ज्ञान आत्मसात करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले.
यानंतर अक्षय पाटील यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI तंत्रज्ञानाचा गैरवापर आणि ‘डीपफेक’च्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. बनावट आवाज, व्हिडिओ किंवा संदेशांच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीपासून कसे सावध राहावे, याबाबत त्यांनी सोप्या उदाहरणांसह मार्गदर्शन केले. अनोळखी क्रमांकावरून आपत्कालीन परिस्थितीचे कारण सांगून पैशांची मागणी झाल्यास घाबरून न जाता संबंधित व्यक्तीची स्वतंत्रपणे खात्री करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
यानंतर लोकेश पाटील यांनी दैनंदिन जीवनातील डिजिटल आणि UPI फसवणुकीबाबत मार्गदर्शन केले. QR कोडचा वापर करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करत त्यांनी OTP किंवा UPI PIN कोणाशीही शेअर करू नये, असा महत्त्वाचा संदेश दिला.
सोशल मीडिया अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी Two-Factor Authentication (2FA) चा वापर, वैयक्तिक माहितीची गोपनीयता जपणे तसेच लॉटरी, पार्ट-टाईम जॉब, आकर्षक ऑफर किंवा इतर आमिषांच्या नावाखाली येणाऱ्या संशयास्पद Phishing Links पासून सावध राहण्याचे उपाय त्यांनी प्रात्यक्षिकासह समजावून सांगितले.
सायबर फसवणुकीचा प्रकार घडल्यास तातडीने योग्य पावले उचलणे महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले. आर्थिक फसवणूक झाल्यास राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांक 1930 वर त्वरित संपर्क साधण्याची तसेच अधिकृत cybercrime.gov.in पोर्टलवर तक्रार नोंदविण्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
कार्यशाळेला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेशी संबंधित विविध प्रश्न विचारले. मार्गदर्शकांनी त्यांच्या शंकांचे निरसन करून ऑनलाइन व्यवहार, सोशल मीडिया आणि डिजिटल साधनांचा सुरक्षित वापर करण्याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्या डॉ. वंदना पाटील आणि सहकाऱ्यांनी अक्षय पाटील व लोकेश पाटील यांचे आभार मानले. विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणाऱ्या या कार्यशाळेची उत्साहात सांगता झाली.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
