दुर्गम भागातील प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत आयुष्मान योजनेचा लाभ पोहोचवा; ई-केवायसी मोहिमेला गती देण्याचे डॉ. ओमप्रकाश शेटे यांचे निर्देश ;नंदुरबारमध्ये आयुष्मान भारत व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनांच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत आरोग्य सेवांचा सखोल आढावा

नंदुरबार येथे आयोजित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी दुर्गम व आदिवासी भागातील प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत आयुष्मान कार्ड आणि कॅशलेस आरोग्य सेवांचा लाभ पोहोचवण्यासाठी ई-केवायसी मोहिमेला गती देण्याचे निर्देश दिले.

आयुष्मान भारत व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी ₹५ लाखांपर्यंत मोफत आरोग्य संरक्षण मिळत असून, लाभार्थी नोंदणी व ई-केवायसी मोहिमेला वेग देण्यावर भर देण्यात आला.

 नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम, आदिवासी तसेच पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या भागांतील एकही पात्र नागरिक आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना यांच्या लाभापासून वंचित राहू नये. यासाठी आयुष्मान कार्डच्या ई-केवायसी मोहिमेला अधिक गती देत गावागावांत विशेष अभियान राबवावे, तसेच शासकीय व योजनेशी संलग्न खासगी रुग्णालयांमार्फत गुणवत्तापूर्ण, पारदर्शक आणि कॅशलेस आरोग्य सेवा प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश स. शेटे यांनी दिले.

नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना यांच्या संयुक्त जिल्हास्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते.

बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनय सोनवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र सोनवणे तसेच आरोग्य विभाग व संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

दुर्गम भागासाठी विशेष नियोजनाची गरज

बैठकीत नंदुरबार जिल्ह्याची भौगोलिक आणि सामाजिक परिस्थिती सविस्तर मांडण्यात आली. जिल्ह्याचे क्षेत्रफळ ५,९५५ चौ. कि.मी. असून अंदाजित लोकसंख्या २० लाख ३२ हजार ५६३ आहे. जिल्ह्यात ६ तालुके, ६३९ ग्रामपंचायती, ९४३ महसुली गावे, ११३ नवसंजीवनी गावे आणि १,०२१ पाडे-वस्त्या आहेत.

याशिवाय पावसाळ्यात २०१ गावे संपर्कापासून तुटतात, तर ६९ गावे वर्षभर दुर्गम राहतात. त्यामुळे या भागांतील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा आणि शासकीय योजनांचा लाभ वेळेत पोहोचविण्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात येत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

जिल्ह्यात सक्षम आरोग्य यंत्रणा

नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी विविध स्तरांवर आरोग्य सुविधा उपलब्ध असून त्यामध्ये –

  • १ वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय
  • २ महिला रुग्णालये
  • २ उपजिल्हा रुग्णालये
  • १२ ग्रामीण रुग्णालये
  • ६४ प्राथमिक आरोग्य केंद्रे
  • २९३ आयुष्मान आरोग्य मंदिरे (आरोग्य उपकेंद्रे)
  • ३ नागरी आरोग्य केंद्रे
  • १० प्राथमिक आरोग्य पथके
  • ८ आयुर्वेदिक दवाखाने
  • ४० भरारी वैद्यकीय पथके
  • ९ नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रे
  • ५ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाने
  • २ ॲलोपॅथिक दवाखाने

कार्यरत असल्याची माहिती बैठकीत सादर करण्यात आली.

ई-केवायसी मोहिमेला गती देण्यावर भर

डॉ. शेटे यांनी आयुष्मान कार्डसाठी ई-केवायसी प्रक्रिया अधिक वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. दुर्गम भागांमध्ये विशेष शिबिरे, ग्रामस्तरावरील जनजागृती, आशा सेविका, अंगणवाडी कर्मचारी, ग्रामपंचायत आणि आरोग्य विभाग यांच्या समन्वयातून पात्र लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला.

पात्र नागरिकांना मिळणार ₹५ लाखांपर्यंत मोफत उपचार

बैठकीत आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या प्रमुख वैशिष्ट्यांचा आढावा घेण्यात आला. १ जुलै २०२४ पासून पात्र कुटुंबांना दरवर्षी ₹५ लाखांपर्यंत कॅशलेस आणि मोफत आरोग्य संरक्षण उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शासनमान्य रुग्णालयांमध्ये विविध गंभीर आजारांवर विनामूल्य उपचाराची सुविधा उपलब्ध असून, अधिकाधिक पात्र नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

विभागांमध्ये समन्वय वाढविण्याचे निर्देश

आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महसूल, आरोग्य, ग्रामविकास, पंचायत राज, महिला व बालविकास आणि इतर संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने कार्य करावे. विशेषतः दुर्गम व आदिवासी भागातील नागरिकांना आरोग्य सेवांचा लाभ घराजवळ उपलब्ध करून देण्यासाठी सर्व यंत्रणांनी जबाबदारीने काम करण्याची गरज असल्याचे डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी स्पष्ट केले.

बैठकीत जिल्ह्यातील योजनांच्या प्रगतीचा आढावा घेऊन ई-केवायसी, लाभार्थी नोंदणी, रुग्णसेवा, कॅशलेस उपचार आणि जनजागृती मोहिमेच्या अंमलबजावणीबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!