आधी तानसेन जन्माला की कानसेन?

पक्ष्यांचे किलबिलाट, निसर्गातील वाऱ्याची सळसळ आणि पाण्याचा खळखळाट यांच्यापासून मानवाच्या संगीतनिर्मितीपर्यंतचा वैज्ञानिक उत्क्रांती प्रवास दाखवणारी आकर्षक माहितीपट शैलीतील प्रतिमा.

निसर्गाचे आवाज ऐकणाऱ्या ‘कानसेना’पासून स्वर निर्माण करणाऱ्या ‘तानसेना’पर्यंतचा उत्क्रांतीचा प्रवास आणि वैज्ञानिक दृष्टिकोन मांडणारा विशेष लेख.

​निसर्गाचा अभ्यास करताना, विशेषतः “पक्षी का गातात?” यावर वाचन करताना एक अत्यंत रंजक आणि वैज्ञानिक वास्तव समजले. हे वास्तव म्हणजे सर्व सजीवांमध्ये आणि मानवामध्ये गाणाऱ्या ‘तानसेना’आधी ऐकणारा आणि समजणारा ‘कानसेन’ जन्माला आला आहे!

​सजीवांच्या उत्क्रांतीत मुख किंवा गायनसंस्थेआधी कान विकसित झाला आहे. कान विकसित होण्यामागे असलेले कारण म्हणजे निसर्गाचा सर्वात प्राथमिक नियम—’संरक्षण आणि अस्तित्व’ (Survival). सुमारे ६० ते ५० कोटी वर्षांपूर्वी पाण्यातील पहिल्या सूक्ष्म जीवांना आणि माशांना गुरुत्वाकर्षणाच्या विरोधात स्वतःचे शरीर सांभाळणे गरजेचे होते. यासाठी कानाचा सर्वात जुना भाग म्हणजे ‘आंतरकर्ण’ (Inner Ear System) विकसित झाला. म्हणजेच आवाज ऐकण्यापूर्वी, शरीराचा समतोल राखण्यासाठी आणि दिशाज्ञानासाठी कानाची पायाभरणी झाली.

​त्यानंतर सुमारे ४० ते ३० कोटी वर्षांपूर्वी जेव्हा जलचर प्राणी जमिनीवर आले, तेव्हा त्यांना हवेतील आणि जमिनीतील कंपने टिपणे गरजेचे होते. हाच शत्रूपासून वाचण्याचा एकमेव मार्ग होता. डोळे फक्त समोरचे पाहू शकतात; मात्र कान अंधारातसुद्धा ३६० अंशांतून येणारा धोका ओळखू शकतात. याच कारणामुळे श्रवणप्रणाली वेगाने उत्क्रांत झाली. पक्षांचा विचार करता, सुमारे १५ ते २० कोटी वर्षांपूर्वी पक्ष्यांच्या पूर्वजांमध्ये कानाची रचना अधिक सूक्ष्मरीत्या उत्क्रांत होत गेली. पक्ष्यांना हवेत उडताना वाऱ्याचा वेग व दिशा लक्षात येण्यासाठी तीक्ष्ण श्रवणशक्तीची गरज निर्माण झाली. या गरजेतूनच निसर्गात पहिला ‘कानसेन’ तयार झाला.

​प्राथमिक अवस्थेतील मानवाने स्वतःचा आवाज काढण्याआधी लाखो वर्षे निसर्गाचे आवाज ऐकले आणि या सातत्यपूर्ण श्रवणाने मानवाच्या मेंदूतील ध्वनी विश्लेषणाची क्षमता मजबूत होत गेली. त्यानंतर सुमारे २ ते ३ लाख वर्षांपूर्वी, ऐकण्याची आणि समजण्याची प्रणाली पूर्ण विकसित झाल्यावर, मानवी स्वरयंत्र (Vocal Tract) खाली सरकले आणि जिभेची हालचाल लवचिक झाली. निसर्गातील लयीचे अनुकरण करत माणसात स्वर जन्माला आले आणि मग हळूहळू भाषा जन्माला आली.

​गायक लोक नेहमी म्हणत असतात की आधी कानसेन तयार झाले पाहिजेत. ही सर्व उत्क्रांती लक्षात घेतली, तर निसर्गाच्या संगीतामध्ये वाऱ्याची सळसळ, पाण्याचा खळखळाट आणि विजेचा कडकडाट आधीपासूनच अस्तित्वात होते. हे निसर्गसंगीत मानवाने कानसेन बनून ऐकले आहे, आत्मसात केले आहे आणि त्यानंतर या लयीतून स्वतःचा गळा विकसित करत, सूर आळवत तो ‘तानसेन’ बनल्याचा इतिहास आहे. त्यामुळे निसर्गाच्या आणि मानवाच्या इतिहासात सर्वप्रथम आस्वाद घेण्याची क्षमता जन्माला आली; म्हणजेच ‘कानसेन’ आधी जन्माला आला आणि मगच सूर आळवणारा ‘तानसेन’ जन्माला आला!

​सृष्टीचा हाच नियम सांगतो की, आधी सूक्ष्म निरीक्षण आणि श्रवण जन्म घेते आणि मगच विवेकपूर्ण विचार आणि अभिव्यक्ती जन्म घेत असते. म्हणूनच आजच्या तरुण पिढीने (Gen Z) कोणत्याही बुवाबाजी किंवा अंधश्रद्धेची कास न धरता, विज्ञानाचा हा तार्किक विचार आत्मसात केला पाहिजे आणि लोकविज्ञानाची गुढी उभारून समाजाला विवेकाची दिशा दाखवली पाहिजे.

टीप: ज्यांना या विषयावर अधिक सखोल वाचन करण्याची इच्छा असेल त्यांनी :-* Bernie Krause यांचे ‘The Great Animal Orchestra: Finding the Origins of Music in the World’s Wild Places’ (Little, Brown and Company, 2012) हे पुस्तक जरूर वाचावे. निसर्गातील नैसर्गिक ध्वनी (Geophony) आणि प्राण्यांचे आवाज (Biophony) हेच मानवी संगीताचे उगमस्थान कसे ठरले, आणि मानवाने आधी ‘कानसेन’ बनून हे निसर्गसंगीत कसे आत्मसात केले, याचा अत्यंत वस्तुनिष्ठ व रंजक प्रवास या पुस्तकात मांडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!