‘मुक्त’च्या प्रभारी कुलसचिवाच्या पीएचडीत अवैध फेरफार

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील डॉ. सुरेंद्र पाटोळे यांच्या पीएचडीच्या संशोधन क्षेत्रातील कथित बदल, सुधारित अधिसूचना व पदवी प्रमाणपत्राच्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी.

य.च.म. मुक्त विद्यापीठातील पीएचडी संशोधन क्षेत्र, सुधारित अधिसूचना आणि पदवी प्रमाणपत्राच्या प्रकरणाबाबत घडलेल्या घटनांचा सविस्तर आढावा.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव डॉ. सुरेंद्र पाटोळे यांच्या पीएचडीच्या संशोधन क्षेत्रात अवैधरीत्या फेरफार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. डॉ. सुरेंद्र पाटोळे यांच्या पीएचडीचा निकाल दि. १३ ऑगस्ट, २०१३ ला जाहीर करण्यात आला व तशी विद्यापीठाने विषय संप्रेक्षण – व्यवस्थापन या क्षेत्रात त्यांना पीएचडी मिळाल्याची अधिसूचना काढली. नंतर दि. १५.३.२०१४ ला संपन्न झालेल्या दीक्षांत समारंभात त्यांना विषय संप्रेक्षण – व्यवस्थापन या क्षेत्रात पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.

नंतर ७ वर्षांनी

२०२० मध्ये वाणिज्य व व्यवस्थापन विद्या शाखेची बैठक झाली, त्यात ५ फेब्रुवारी २००७ नंतर प्रवेशित पीएचडीच्या विद्यार्थ्यांना, विद्यापीठाच्या अध्यादेश ३६ च्या नुसार शुद्ध वाणिज्य किंवा शुद्ध व्यवस्थापन विषयात प्रदान करण्याबाबत विषय ठेवण्यात आला. त्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली, जिचे अध्यक्ष प्रा. पंडित पलांडे होते. त्या विद्या शाखाने स्थापित समितीने हा विषय मान्य केला. या विषय, नंतर झालेल्या विद्वत परिषद मध्ये ठेवण्यात आला. यात विद्याशाखा परिषदेत नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने केलेल्या शिफारशीवर अंतिम निर्णय घेण्यापूर्वी, यावर कायदेशीर बाबी तपासण्यासाठी माननीय कुलगुरूंनी समिती गठीत करावी, असे ठरले व समितीचा अहवाल आल्यानंतर तो अहवाल पुन्हा विद्वत परिषदेत ठेवावा, असे सर्वानुमते ठरले.

विद्वत परिषदेत असा निर्णय होऊनही व पीएचडी मिळाल्यानंतर ७ वर्षांनी डॉ. सुरेंद्र पाटोळेंनी वाणिज्य व्यवस्थापन विद्याशाखा संचालकांना पत्र लिहून विद्यापीठाच्या अध्यादेश ३६ प्रमाणे त्यांच्या पीएचडीचे क्षेत्र विषय संप्रेक्षण – व्यवस्थापन ऐवजी व्यवस्थापन करण्याची विनंती केली. मा. कुलगुरूंना विव्दत परिषदेच्या निर्णयाबाबत अंधारात ठेऊन, तत्कालीन संचालक, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा यांनी सर्व संबंधित कागदपत्रे तपासून डॉ. सुरेंद्र पाटोळेंचे पीएचडीचे क्षेत्र हे ‘विषय संप्रेक्षण – व्यवस्थापन’ ऐवजी ‘व्यवस्थापन’ करण्याचे प्रमाणित केले, व तशी शिफारस करून मा. कुलगुरूंकडे मान्यतेसाठी पाठविली. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, संचालकांनी प्रमाणित केल्याने, सुधारित अधिसुचना काढण्याबाबतचा शेरा मा. कुलगुरूंनी दिला.

विद्वत परिषदमध्ये पीएचडीच्या क्षेत्रात बदल करण्याबाबत निर्णय झालेला नसताना, परस्पर वाणिज्य व व्यवस्थापन विद्या शाखा संचालक व परीक्षा नियंत्रकांनी मा. कुलगुरूंची दिशाभूल करून, पीएचडीचे क्षेत्र ‘विषय संप्रेक्षण – व्यवस्थापन’ असताना, ते ‘व्यवस्थापन’ केले.

पीएचडीच्या क्षेत्रात बदल केल्यानंतर चार महिन्यांनी त्याचा फायदा घेत डॉ. सुरेंद्र पाटोळे हे करिअर ॲडव्हान्समेंट स्कीमव्दारे सहयोगी प्राध्यापक झाले. समजा त्यांचे पीएचडीचे क्षेत्र हे व्यवस्थापन केले गेले नसते, तर ते सहयोगी प्राध्यापक होऊ शकले नसते. नंतर तीन वर्षांनी ते प्राध्यापक पण झाले.

डॉ. सुरेंद्र पाटोळे हे सहयोगी प्राध्यापक झाल्यानंतर जवळपास एक महिना नंतर, परीक्षा नियंत्रकांनी माननीय कुलगुरूंना पत्र लिहून कळविले की, त्यांच्या परीक्षा विभागाला, विद्वत परिषदेमध्ये वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या संपन्न झालेल्या बैठकीतील पारित झालेला निर्णय‌ व त्यानुसार विद्या शाखा परिषदेत नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने केलेल्या शिफारशीवर अंतिम निर्णय घेण्यापूर्वी, यावर कायदेशीर बाबी तपासण्यासाठी माननीय कुलगुरूंनी समिती गठीत करावी हे ठरल्याचे व समितीचा अहवाल आल्यानंतर तो अहवाल पुन्हा विद्वत परिषदेत ठेवण्यात यावा या बाबतची माहिती आता समजल्याचे लिहिले.

त्यामुळे वर्ष २०१३ ला डॉ. सुरेंद्र पाटोळे यांना प्रदान केलेल्या पीएचडी पदवीच्या अधिसूचनेत व २०१४ मध्ये पदवी प्रमाणपत्रात पीएचडीच्या क्षेत्रात जो बदल केला गेला, याबाबत मार्गदर्शन करण्याची विनंती ही परीक्षा नियंत्रकांनी माननीय कुलगुरूंना केली. त्यावर मा. कुलगुरूंनी तात्काळ डॉ. सुरेंद्र पाटोळे यांच्या पीएचडी बाबतची सुधारित अधिसुचना आणि सुधारित पदवी प्रमाणपत्राला स्थगिती दिली व त्यांना सुधारित अधिसुचना व पदवी प्रमाणपत्र हे परीक्षा विभागात जमा करण्याचे निर्देश दिले.

त्याच बरोबर सुधारित पदवीचा शैक्षणिक व व्यावसायिक कामासाठी उपयोग न करण्याचे निर्देश डॉ. सुरेंद्र पाटोळेंना दिले. तसेच सुधारित पदवीचा कुठेही वापर केल्यास त्यासाठी डॉ. सुरेंद्र पाटोळे जबाबदार राहतील, हे पण स्पष्ट केले.

पीएचडीचे सुधारीत पदवी प्रमाणपत्र डॉ. पाटोळेंनी परीक्षा विभागात जमा केले की नाही, याबाबत शंकाच आहे, कारण २०२५ मध्ये ते प्राध्यापक पण झाले.

एकंदरीत, विद्वत परिषदेला अंधारात ठेऊन व मा. कुलगुरू यांची दिशाभूल करून पीएचडीच्या संशोधन क्षेत्रात बदल करून त्याचा फायदा सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापक होण्यासाठी घेण्यात आल्याचे व नंतर काही महिन्यांनी पीएचडीची सुधारित अधिसुचना व पदवी प्रमाणपत्र मागे घेण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते.

याची सखोल चौकशी मा. कुलगुरूंनी करावी व दोषी व्यक्तींवर कारवाई करणे अपेक्षित आहे, कारण ही बाब गंभीर असून असे पीएचडी ही शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातील सर्वोच्च शैक्षणिक पदवी आहे व त्याच्या संशोधन क्षेत्रात विद्यापीठ प्रशासन परस्पर बदल करत असेल, तर विद्यापीठाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होणे स्वाभाविक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!