समाज व्यवस्थेतील सन समारंभ आणि कर्जबाजारीपणा : एक समस्या

सणसमारंभ, सामाजिक प्रतिष्ठा आणि वाढता खर्च यामुळे सर्वसामान्य कुटुंबांवर वाढणाऱ्या कर्जाच्या ओझ्यावर प्रा. सुदर्शन किशनराव शेळके यांचा विचारप्रवर्तक लेख.

खोटी प्रतिष्ठा, महागाई, दिखाऊपणा आणि सणउत्सवांचा वाढता खर्च यामुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक व आर्थिक समस्यांवर भाष्य करणारा लेख.

भारतीय समाज हा संस्कृती प्रिय समाज आहे. भारतीय समाजात विविध धर्माचे व जातीपंथाचे लोक एकत्र नांदत असताना आपणास पाहावयास मिळतात. भारतीय समाजातील सण आणि उत्सव याच्या माध्यमातून ईश्वराशी, सृष्टीशी, आप्तस्वकीयांशी, प्रेषित आणि वीर नाईकाशी एक मूल्यात्मक नाते रुजविण्याचा प्रयत्न केला आहे. ऋतूनुसार होणारे धार्मिक समारंभ, भोजन प्रसंग, उत्सवातील विविध प्रसंग यातून संस्कृती विस्तारीत होत गेली आहे.

भारतीय समाजात सणसमारंभ हे मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. आपली संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न करतात. समाजामध्ये विशिष्ट अशा गोष्टींना महत्त्व दिले जाते. आज प्रत्येक धर्मात आपली संस्कृती जोपासण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला जात आहे. सणसमारंभ हा एक आगळा वेगळा साजरा करण्याचा प्रयत्न प्रत्येक धर्मातील व्यक्ती आपआपल्यापरीने साजरा करण्याचा प्रयत्न एक उत्साह प्रसंग साजरा करण्याचा अट्टाहास धरतात.

समाजातील सण आणि कर्जबाजारीपणा यांचा खूप जवळचा संबंध दिसून येतो. फक्त एका समाजापुरता मर्यादित नाही तर सर्व भारतीय समाजातील जनतेचा आहे. आज मोठ्या प्रमाणात सण उत्सव साजरी केली जातात. प्रत्येक समाजात सण उत्सवामुळे खूप मोठ्या प्रमाणात एक बेगडी स्पर्धा निर्माण झाली आहे. आपला भारतीय समाज अनुकरणप्रिय समाज असल्यामुळे, प्रत्येक धर्माचे अनुकरण करून आपआपल्यापरीने सण साजरे करण्याचा प्रयत्न करतात. दिखाऊ स्वरूपाची स्पर्धा दिसून येते.

समाजातील प्रतिष्ठेसाठी काही लोक सण साजरे करतात. ग्रामीण भाग असो की शहरी भाग असो. मोठ्या प्रमाणामध्ये सण साजरा करण्याची प्रथा आढळून येते. समाजामध्ये काही लोक हे खूप गरीबीमध्ये जिवन जगतात. पण धार्मिक श्रद्धेपोटी म्हणा किंवा एक बदल म्हणून म्हणा, ते सण साजरा करीत असतात.

समाज व्यवस्थेमध्ये लोकांकडे पैसे नसतील तर अशी प्रथा निर्माण झाली आहे की, रीन काढुन सण साजरे करणे, ही प्रथा समाजात खूप मोठ्या प्रमाणात दिसून येते. याचे कारण म्हणजे समाजातील श्रद्धा, मूल्य, परंपरा, संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न केला जातो. पैसे नसले तरी पैसे व्याजाने घेऊन सण साजरा करण्याची प्रथा आपल्या समाजामध्ये दिसून येते.

सन एक सामाजिक प्रतिष्ठा म्हणून साजरा केला जातो. समाजामध्ये प्रत्येक जाती धर्माचे वेगवेगळे सण आहेत. जसे की, दिपावली, गणपती, दसरा, ईद, ख्रिसमस, रंगपंचमी, मकर संक्रात., नागपंचमी. व प्रत्येक धर्मातील महापुरुषांच्या जयंत्या सुद्धा एक सण म्हणूनच साजरा केला जात आहे.

काही लोकांकडे सण साजरा करण्यासाठी पैसे असतात, तर काही जणांकडे पैसे नसतात. म्हणून ते समाजाच्या प्रतिष्ठेसाठी व मुलाबाळांच्या इच्छा आकांक्षासाठी सन साजरा करतात. आपली परिस्थिती नसतानाही आपली संस्कृती जोपासण्यासाठी सन साजरा करतात.

सन साजरे करताना कुटुंबातील कुटुंब प्रमुख व्यक्तीला आर्थिक ताणतणाव येत असतो. आर्थिक अडचण भासत असते. ते ना विलाजाने, आपल्या कुटुंबातील सर्व लहान मुले व व्यक्ती सुखी व आनंदी राहावीत यासाठी सावकाराकडून किंवा कुठल्यातरी व्यक्तीकडून उसने पैसे घेऊन सण साजरा करत असतात.

सणासाठी लागणारा खर्च कपडे, फराळ, दागिने, भेटवस्तू. लेकी बाळीला आणने. यामुळे आर्थिक परिस्थिती कोलमोडते व दिवसेंदिवस गरीबी किंवा दारिद्र्यांमध्येच एखाद्या कुटुंबाला आपल्या जीवनाचा चरितार्थ तसाच भागवावा लागतो. काहींना कपडेलते मिळतात, तर काहींना मिळत सुद्धा नाहीत. त्यांना असाच संसाराचा गाडा पुढे ढकलत न्यावा लागतो. यातूनच त्यांच्या जीवनामध्ये एक नैराश्याची भावना उद्भवत असते.

कुटुंबातील महिलावरही कामाचा भार वाढत असतो. स्वयंपाक करणे, साफसफाई करणे, पाहुण्यांचा पाहुणचार करणे, या सर्वांचा भार कुटुंबातील महिलावर पडत असतो. त्यामुळे त्यांचे आरोग्य बिघडू शकते.

आज समाजाचे वास्तव चित्र बदललेले दिसून येते. कोणत्याही कार्यक्रमाला एक वेगळे रूप आले आहे. आज सन समारंभाच्या उत्सवासाठी लोक कशाचीच परवा न करता व्याजाने पैसे काढून मुला बाळांना व आप्तसंबंधीय नातेवाईकांना कपडेलते घेतात. पैसे असो अथवा नसो, याचा विचार न करता प्रतिष्ठेपायी हे सण उत्सव साजरी करण्याचा आनंद घेत असतात. आणि कर्जबाजारी होत असतात.

काहीजण व्यसनाच्या आहारी जाऊन अनेक समस्यांना बळी पडतात. प्रत्येक समाजात गरिबापासून ते श्रीमंतापर्यंत सण साजरा करण्याची प्रथा समाजात रूढ झाली आहे. त्यामुळे समाजात एक प्रतिष्ठेचा भाग म्हणूनही त्याच्याकडे बघितले जाते. लेकी बाळीला लेकराला कपडेलते केले तर काहीच कमी पडणार नाही, ही त्यांची धारणा असते.

समाजातील विविध लोक आपापल्या धर्माचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. त्यात त्यांच्या खर्च होतो, पण ते पैशाकडे लक्ष देत नाहीत. प्रत्येक सणानिमित्त घरामध्ये नवनवीन वस्तू घेतली जाते. सोबतच वस्तूंवरील भरगोस सूटीच्या अमिशातून चैनीच्याही वस्तू घेऊन कुटुंब कर्जबाजारी होतात.

समाजव्यवस्थेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात श्रद्धा पाळली जाते. श्रद्धेपोटी व्यक्ती काहीही करायला तयार असतो. समाजाची मूल्य जोपासण्याचा प्रयत्न करतात. आज समाजात इतकी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे की, समाजातील प्रतिष्ठेसाठी लोक आपला उत्साह, आनंद सणाच्या निमित्ताने साजरा करतात.

पुरुषी वर्गामध्ये खूप मोठा गैरसमज निर्माण झाला आहे. कोणत्याही सणसमारंभामध्ये सुखलोलुपवृत्तीने एक फॅशन म्हणून मद्यपान करणे, ब्रिस्टॉल ओढणे, पार्ट्या करणे, ही एक फॅशन बनली आहे.

ग्रामीण भागातील लोक कामानिमित्त शहराकडे स्थलांतर करतात. कंपनीमध्ये काम करतात. आणि सणासुदीच्या निमित्ताने आपल्या गावाकडे सणउत्सव साजरा करण्यात करिता येतात. कंपनीमधला तुटपुंजा पगार त्यांना पुरेसा होत नाही. ते आपल्या गावी येऊन अवाढव्य खर्च करतात. आणि परत तिकडे कामाला जाण्यासाठी त्यांच्याकडे तिकीटासाठी पैसे नसतात.

सणउत्सवाचे निमित्त पाहून सरकार असो की खाजगी वाहन, यांचे भाडे वाढते. तेव्हा ते लोक एखाद्या मित्राकडून किंवा सावकाराकडून पैसे घेऊन जातात. ही एक बेगडी किंवा खोटी प्रतिष्ठाच म्हणावी लागेल.

सरकारच्या धोरणामुळे किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यामुळे महागाईने तोंडवर काढलेले असते. हे काहींना खरेदीला गेल्यावरच कळते. ह्यात चालीरीतीचा सर्वात मोठी बळी शेतकऱ्याचा जातो. ज्या वेगाने महागाई वाढते, त्या प्रमाणात त्यांचे उत्पन्न वाढत नाही.

याउलट दुकानदार त्यांच्या माल खपवण्याच्या निमित्ताने ग्राहकाला सांगतात, “अहो दादा, तुमच्या गावच्या प्रतिष्ठित व्यक्तीने ही वस्तू नेली या सणाला तेही आणि आम्हीही वापरणार आहोत तुम्ही घेऊन जा.”

म्हणजे सामान्यांच्या यादीत आणि नजरेत नसलेल्या गोष्टीही तो खोट्या प्रतिष्ठेला भुलून सहजच घेऊन जातो. एखादी वस्तू ग्राहक म्हणून किंवा आपल्याला खूपच गरजेची आहे का, हा तो पाहाच नाही.

सध्या नफेखोरीच्या युगात सणउत्सवांमधून जनसामान्याचे जीवन भरडून निघत आहे. थोडा विचारकरून सणउत्सव साजरा करताना भान बाळगून सर्वांनी खर्च केला तर खोट्या प्रतिष्ठेसाठी माणूस कर्जबाजारी होणार नाही.

त्यामुळे आज समाजाचे चित्र ह्या सणसमारंभामुळे बदलत असताना किंवा सणसमारंभाचा ऱ्हास होत असताना आपणास पाहावयास मिळत आहे.

शेळके सुदर्शन किशनराव
श्रीनिवास विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत.
ता. वसमत. जि. हिंगोली
मो. न. 9822644781

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!