डिजिटल युगात सावधगिरीच खरी सुरक्षा! मराठवाडा रेल कोच फॅक्टरीत कर्मचाऱ्यांसाठी सायबर जनजागृती

मराठवाडा रेल कोच फॅक्टरी, लातूर येथे क्विक हील फाउंडेशन आणि राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने सायबर सुरक्षा जनजागृती सत्र घेण्यात आले. यावेळी नरेश पंडित व अविष्कार कांबळे यांनी कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, OTP, पासवर्ड आणि सुरक्षित डिजिटल व्यवहाराबाबत मार्गदर्शन केले.

ई-मेल, मोबाईल, वैयक्तिक माहिती आणि डिजिटल व्यवहार सुरक्षित ठेवण्याबाबत मार्गदर्शन; फसवणूक झाल्यास १९३० हेल्पलाइनवर संपर्क करण्याची माहिती.

डिजिटल व्यवहारांचा वाढता वापर आणि त्यासोबत वाढणाऱ्या सायबर फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी डिजिटल सुरक्षिततेबाबत सजग राहणे आवश्यक आहे. याच उद्देशाने राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर आणि क्विक हील फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या उपक्रमांतर्गत मराठवाडा रेल कोच फॅक्टरी, लातूर येथे सायबर सुरक्षा जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले.

या सत्रात फॅक्टरीतील कर्मचारी तसेच सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांना विविध प्रकारच्या सायबर धोक्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सायबर वॉरिअर नरेश पंडित आणि अविष्कार कांबळे यांनी ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, संशयास्पद लिंक, मजबूत पासवर्ड, ओटीपी सुरक्षा, वैयक्तिक माहितीचे संरक्षण, ई-मेल व मोबाईल सुरक्षा तसेच सुरक्षित डिजिटल व्यवहार याबाबत सविस्तर माहिती दिली.

सायबर गुन्हेगारांकडून फसवणुकीसाठी बनावट लिंक, संदेश, ई-मेल किंवा इतर डिजिटल माध्यमांचा वापर केला जात असल्याने कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करण्यापूर्वी तिची खात्री करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. तसेच ओटीपी, पासवर्ड, बँकिंग तपशील आणि अन्य गोपनीय माहिती कोणत्याही व्यक्तीसोबत शेअर करू नये, असे आवाहन करण्यात आले.

सायबर फसवणूक झाल्यास विलंब न करता १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, अशी महत्त्वाची माहितीही यावेळी देण्यात आली. सुरक्षित डिजिटल व्यवहारांसाठी जागरूकता, सतर्कता आणि जबाबदार डिजिटल वापर आवश्यक असल्याचा संदेश या सत्रातून देण्यात आला.

दरम्यान, फॅक्टरीतील कर्मचारी आणि सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांनी सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सहभागी कर्मचाऱ्यांनी विविध प्रश्न उपस्थित करून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. प्रत्यक्ष उदाहरणे आणि संवादाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या मार्गदर्शनामुळे सत्र अधिक परिणामकारक ठरले.

डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढत असताना त्यासोबत सायबर सुरक्षेची जाणीव वाढविणे हीदेखील काळाची गरज आहे. सावधगिरी, माहितीची गोपनीयता आणि सुरक्षित डिजिटल सवयी यांमुळे सायबर फसवणुकीचा धोका मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकतो, असा संदेश या जनजागृती उपक्रमातून देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!