जळगावात २८ मार्च रोजी ‘विराट हिंदू मेळावा’; सायंकाळी ६ वाजता आयोजन: Virat Hindu Melava in Jalgaon

 

जळगाव – शहरातील बळीराम पेठ परिसरात सकल हिंदू समाजाच्या वतीने, शनिवार (२८ मार्च) रोजी भव्य ‘विराट हिंदू मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. बळीराम पेठेतील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात सायंकाळी ठीक ६ वाजता हा सोहळा पार पडणार असून या माध्यमातून हिंदुत्वाचा जागर केला जाणार आहे.

या मेळाव्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे कानळदा येथील प्राचीन कण्वाश्रमाचे गादीपती अद्वैतानंदजी स्वामी यांची उपस्थिती. स्वामीजी उपस्थित जनसमुदायाला आशिर्वचन देणार असून त्यांच्या मार्गदर्शनामुळे मेळाव्यात उत्साहाचे वातावरण निर्माण होणार आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून विश्व हिंदू परिषदेचे विभाग मंत्री देवेंद्र भावसार मार्गदर्शन करणार आहेत. ते आपल्या भाषणातून हिंदू समाजासमोरील विविध आव्हाने व कर्तव्यांवर प्रकाश टाकणार आहेत. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या तसेच ज्येष्ठ पत्रकार शांताताई वाणी असणार आहेत.

मेळाव्यानंतर रात्री ८:३० वाजता आझाद क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळाच्या वतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी बळीराम पेठेतील सामाजिक कार्यकर्ते, महिला भगिनी, युवक वर्ग तसेच विविध गणेश मंडळे, देवी मंडळे आणि देवस्थानचे पदाधिकारी मोठ्या उत्साहाने परिश्रम घेत आहेत. संपूर्ण परिसरात भगवे वातावरण निर्माण झाले असून सर्व हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन हिंदू मेळावा समितीचे उपाध्यक्ष डॉ. कृणाल महाजन यांनी केले आहे.

#hindu_melava #sthanilsamachar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!