जळगाव – जळगाव (ग्रामीण) तालुका काँग्रेस कमिटीने जिल्ह्यातील सौर कृषी पंप योजनेतील अनियमितता आणि शेतकऱ्यांच्या वाढत्या तक्रारींबाबत प्रशासनाचे लक्ष वेधत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनातून महाऊर्जा विभाग व संबंधित ठेकेदारांवर गंभीर आरोप करत शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी सौर कृषी पंप योजना राबविण्यात येत आहे. मात्र जळगाव जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी समाधानकारक होत नसल्याचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. महाऊर्जा अधिकाऱ्यांची निष्क्रियता आणि ठेकेदारांची मनमानी यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी लेखी तसेच व्हिडिओद्वारे तक्रारी नोंदवल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनानुसार, सौर पंप मंजुरीसाठी होणाऱ्या सर्वेक्षण टप्प्यातच आर्थिक व्यवहार होत असल्याचे आरोप आहेत. पैसे देऊ न शकणाऱ्या शेतकऱ्यांची नावे योजनेत समाविष्ट केली जात नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. तसेच मंजुरीनंतर देण्यात येणारे साहित्य विविध कंपन्यांचे एकत्रित स्वरूपात असल्याने शेतकऱ्यांची फसवणूक होत असून, पाच वर्षांच्या मोफत सेवेसंदर्भात अडचणी निर्माण होत आहेत.
याशिवाय, तक्रारीनंतर महाऊर्जा अधिकाऱ्यांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. संबंधित कंपनीशी संपर्क साधण्यास सांगितले जाते, मात्र कंपनीकडूनही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. सेवा केंद्रांची सुविधा उपलब्ध नसल्याने पिकांचे नुकसान होऊन शेतकरी कर्जबाजारी होत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
तालुका काँग्रेस अध्यक्ष मनोज दिगंबर चौधरी यांनी माहितीच्या अधिकाराखाली मागवलेल्या माहितीतही त्रुटी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अपूर्ण व दिशाभूल करणारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस कमिटीने केली आहे. तसेच समस्या तातडीने न सोडवल्यास महाऊर्जा कार्यालयाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
हे निवेदन तालुकाध्यक्ष मनोज चौधरी यांच्या नेतृत्वाखाली विशाल सपकाळे, रवींद्र सोनवणे, गणेश भालेराव, प्रदीप घोलप, मिलिंद भालेराव, महिला तालुकाध्यक्ष प्रतिभा सोनवणे, संगीता मोरे, अर्चना गाडे, नितीन चौधरी, समाधान कोळी, राजू शेवाळे आदींच्या स्वाक्षरीने सादर करण्यात आले.
#collector_office_jalgaon #congress #sthaniksamachar

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
