केवायसीच्या बहाण्याने विवाहितेचा विनयभंग; गुन्हा दाखल

जळगाव शहरात केवायसीच्या बहाण्याने विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना उघड; आरोपी गोकुळ चव्हाणविरुद्ध गुन्हा दाखल. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर.

 
जळगाव : शासकीय योजनेचे काम करून देण्याचे आमिष दाखवत आणि केवायसी कागदपत्रे घेण्याच्या बहाण्याने एका विवाहितेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना जळगाव शहरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेंदालाल मिल परिसरातील एका इमारतीत पीडित महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. संशयित आरोपी गोकुळ चव्हाण (रा. मिथिला अपार्टमेंट, जळगाव) हा २५ जानेवारी रोजी दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास पीडितेच्या घरी ‘केवायसी’ कागदपत्रे घेण्यासाठी गेला होता.

यावेळी पीडितेने आवश्यक कागदपत्रे दिल्यानंतर आरोपीने “मी तुमचे लाडकी बहीण योजनेचे काम करून देतो, मात्र मला तुमच्याशी एका विषयावर बोलायचे आहे,” असे सांगत तिच्याकडे अश्लील मागणी केली आणि विनयभंग केल्याचा आरोप आहे.

दरम्यान, आरोपी गोकुळ चव्हाण हा मार्च महिन्यापासून सातत्याने पीडितेच्या घराच्या परिसरात फिरत होता. तो वारंवार घराच्या खिडकीजवळ येऊन किंवा किचनसमोर उभा राहून पीडितेकडे पाहत असे, तसेच तिचा पाठलाग करून मानसिक त्रास देत होता.

या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेने जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!