डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांचा जीवघेणा हल्ला; बॅनर वादातून हिंसाचार; हल्लेखोरांचा थरार

"भरदिवसा दहशतीचा थरार: बॅनर वादातून मुकुंद सपकाळे यांच्यावर जीवघेणा हल्ला; जळगावच्या रिंग रोड परिसरात तणावाचे वातावरण."

जळगावात मुकुंद सपकाळे यांच्यावर भरदिवसा जीवघेणा हल्ला. बॅनर वादातून वाहनाची तोडफोड आणि हिंसाचार. वाचा घटनेचा सविस्तर थरार आणि सध्याची परिस्थिती.

जळगाव – शहरात शनिवारी (दि. ११ एप्रिल) दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र जनक्रांती मोर्च्याचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात सपकाळे जखमी झाले असून त्यांच्या चारचाकी वाहनाची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुकुंद सपकाळे हे आपल्या नियोजित कामानिमित्त गोविंदा रिक्षा स्टॉप येथून रिंग रोडमार्गे बहिणाबाई उद्यान चौकाकडे जात होते. त्यावेळी हॉटेल सायली जवळ काही हल्लेखोरांनी त्यांचा रस्ता अडवला. बॅनर छपाईच्या कारणावरून सुरू झालेला वाद अचानक हिंसक झाला.

हल्लेखोरांनी लाठ्या-काठ्या व धारदार शस्त्रांचा वापर करत सपकाळे यांच्या वाहनावर हल्ला चढवला. वाहनाच्या सर्व बाजूंनी काचा फोडून मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आले. त्यानंतर हल्लेखोरांनी सपकाळे यांच्यावरही हल्ला केल्याने ते जखमी झाले.
घटनेदरम्यान परिसरात आरडाओरड झाल्याने स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांचा वाढता जमाव पाहून हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. जखमी सपकाळे यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

दरम्यान, या हल्ल्यामागे विशाल अहिरे नावाच्या व्यक्तीचा सहभाग असल्याचा आरोप मुकुंद सपकाळे यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. पोलिसांनी घटनेची नोंद घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!