अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनीवर कोट्यवधींच्या अपहाराचा आरोप; नगरसेवक अरविंद देशमुख यांनी जनहिताच्या दृष्टीने ही तक्रार केली सादर

जळगाव महापालिकेच्या रस्ते प्रकल्पातील कथित गैरव्यवहार प्रकरणी अटलांटा कंपनीविरोधात चौकशी व कठोर कारवाईची मागणी.

 
जळगाव : अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लि. व त्यांच्या संचालकांविरुद्ध फसवणूक, विश्वासघात आणि आर्थिक अपहार केल्याचा गंभीर आरोप करत फौजदारी तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. जळगाव महानगरपालिकेचे नव्याने निवडून आलेले नगरसेवक अरविंद देशमुख यांनी जनहिताच्या दृष्टीने ही तक्रार सादर केली आहे.

तक्रारीनुसार, संबंधित कंपनीला सन १९९७ मध्ये जळगाव नगरपरिषदेकडून रस्ते डांबरीकरण प्रकल्पाचे कंत्राट देण्यात आले होते. मात्र, कंत्राट मिळवितानाच कंपनीने आवश्यक क्षमता व आर्थिक अटी पूर्ण करण्याची तयारी नसताना चुकीची व भ्रामक माहिती देऊन कंत्राट मिळवल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच फसवणुकीचा हेतू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कंपनीने कंत्राटानुसार काम वेळेत पूर्ण केले नाही. वारंवार मुदतवाढ घेऊनही काम अपूर्ण ठेवण्यात आले. तसेच कंपनीला मोबिलायझेशन अॅडव्हान्स म्हणून सुमारे 10 कोटी 35 लाख रुपये देण्यात आले होते; मात्र ही रक्कम प्रकल्पासाठी वापरण्याऐवजी अन्यत्र वळवण्यात आल्याचा संशय आहे. आवश्यक बँक गॅरंटी न देणे हे देखील गंभीर अनियमिततेचे लक्षण असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

तक्रारीनुसार, कंपनीने महापालिकेची सुमारे ४ कोटी ७९ लाख रुपयांची मूळ देय रक्कम दीर्घकाळ प्रलंबित ठेवली आहे. सन २०२ पासून आजपर्यंत ९ टक्के चक्रवाढ व्याजदराने विचार करता, एकूण नुकसान रक्कम अंदाजे ४१ कोटी ३४ लाख ११ हजार ५६२ रुपये इतकी होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. ही रक्कम न भरल्याने महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून जनतेच्या निधीचा अपहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याशिवाय, महापालिकेकडून वारंवार पत्रव्यवहार, सूचना व बैठकीसाठी बोलावूनही कंपनीने जाणीवपूर्वक टाळाटाळ केल्याचा आरोप आहे. ही संपूर्ण कृती पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी संबंधित कंपनी व त्यांच्या संचालकांविरुद्ध BNS कलम ३१८(४), ३१६(२) व ६१(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, महापालिकेचे झालेले कोट्यवधींचे नुकसान वसूल करावे आणि आवश्यक असल्यास आरोपींची मालमत्ता जप्त करावी, अशी मागणीही अर्जदाराने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!