‘कॉर्पोरेट जिहाद’विरोधात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचा एल्गार राष्ट्रपतींकडे निवेदन सादर,कठोर कारवाई करण्याची मागणी

"जळगाव: ‘कॉर्पोरेट जिहाद’ आणि विविध सामाजिक मुद्द्यांवर कारवाईसाठी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन."

जळगाव: लँड जिहाद, शैक्षणिक संस्थांची चौकशी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील कथित प्रवृत्तींविरोधात हिंदू संघटना आक्रमक. केंद्र सरकारने तातडीने पावले उचलण्याचे आवाहन.

जळगाव : शहरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने बुधवारी (दि. २२ एप्रिल) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. ‘कॉर्पोरेट जिहाद’विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करत केंद्र सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली असून देशाचे राष्ट्रपती यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर करण्यात आले.

आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी विविध मुद्द्यांवर आवाज उठवत देशात कथित जिहादी मानसिकतेशी संबंधित प्रकरणे विविध स्तरांवर समोर येत असल्याचा आरोप केला. विशेषतः कॉर्पोरेट क्षेत्रातही अशा प्रवृत्तींचा प्रभाव वाढत असल्याचा दावा करत या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

निवेदनात नाशिकमधील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) कंपनीशी संबंधित प्रकरणाचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच उत्तर प्रदेशातील काही घटनांचा संदर्भ देत महिलांविरोधातील कथित शोषणाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. या घटनांमुळे समाजात भीती व अस्वस्थता निर्माण होत असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.

याशिवाय, अल फलाहा युनिव्हर्सिटीशी संबंधित कथित दुव्यांचा मुद्दा उपस्थित करत काही शैक्षणिक संस्थांची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. ‘लँड जिहाद’च्या माध्यमातून अवैध अतिक्रमण होत असल्याचा आरोप करत सार्वजनिक व सरकारी जमिनींचे संरक्षण करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.

खानपानाशी संबंधित बाबींमध्येही काही गैरप्रकार होत असल्याचा आरोप करत नागरिकांच्या धार्मिक भावना व आरोग्याशी संबंधित मुद्द्यांवर लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात आली. या सर्व प्रकारांमुळे समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता असून प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

या वेळी जिल्हाध्यक्ष हरीश मुंदडा, विभाग मंत्री देवेंद्र भावसार, जिल्हा मंत्री राकेश लोहार, महानगर मंत्री किरण पराशर, हरीश कोल्हे, यश पांडे, विद्यार्थिनी आस्था पाटील यांसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलन शांततेत पार पडले असून, प्रशासन पुढे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!