शासकीय कामात अडथळा! जळगावात ‘एमएसईबी’ अभियंत्यावर हल्ला. टेंडर माहितीसाठी दबाव आणणाऱ्या संजय वराडेवर जिल्हापेठ पोलिसांत कारवाई.
जळगाव : महावितरण कंपनीच्या टेंडर संदर्भातील गोपनीय माहिती देण्यास नकार दिल्याच्या रागातून सहाय्यक अभियंत्याला त्यांच्या केबिनमध्ये घुसून मारहाण केल्याची गंभीर घटना जळगावात घडली आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदीपकुमार रणछोड बडगुजर (वय ५७, रा. मेहरूण) हे महावितरण कंपनीच्या जळगाव विभागातील दीक्षितवाडी येथील कार्यालयात सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत आहेत. सोमवार, २० एप्रिल रोजी दुपारी सुमारे १२ वाजता ते आपल्या केबिनमध्ये नियमित शासकीय कामकाज करत असताना संजय रामभाऊ वराडे (रा. चिंचोली, ता. जळगाव) हा अचानक त्यांच्या केबिनमध्ये शिरला.
त्याने ‘एमएसईबी’च्या टेंडर संदर्भातील काही गोपनीय माहितीची मागणी केली. मात्र, ही माहिती देणे नियमबाह्य असल्याने बडगुजर यांनी स्पष्ट नकार दिला. यामुळे संतप्त झालेल्या वराडे याने अरेरावी करत बडगुजर यांच्या शर्टची कॉलर पकडून शर्ट फाडला आणि बटणे तोडली.
इतक्यावरच न थांबता त्याने बडगुजर यांना चापट-बुक्क्यांनी मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच केबिनमधील शासकीय फाईल्स अस्ताव्यस्त फेकून गोंधळ घातला. “तुम्ही माझ्या बोटातील सोन्याची अंगठी काढली, अशी खोटी तक्रार देईन,” अशी धमकीही त्याने दिली.
या घटनेनंतर बडगुजर यांनी तात्काळ जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी संजय वराडे याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.
जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय भांडारकर हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
