चोपडा तालुक्यातील हिंदू संमेलनात संत-महंतांचे मार्गदर्शन; ‘लव्ह जिहाद’विरोधात जनजागृती, हनुमान चालीसा पठण व सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण भारावले.
चोपडा : (निमगव्हाण) येथील तीर्थक्षेत्र श्री धुनिवाले दादाजी मंदिराच्या प्रांगणात तापी परिसर सकल हिंदू समाजाच्या वतीने विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या संमेलनात मोठ्या संख्येने नागरिक, युवक आणि माता-भगिनी उपस्थित होते.
कार्यक्रमात ह.भ.प. योगीराज महाराज चिंचोलीकर यांनी मार्गदर्शन करताना हिंदू मुलींनी ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात अडकू नये, तसेच आपल्या धर्माचा व संस्कृतीचा अभिमान बाळगावा, असे आवाहन केले. धर्म आणि छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने समाजाने संघटित राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
संमेलनाच्या अध्यक्षस्थानी शिव मंदिर पांजरिया धाम वरला (म.प्र.) येथील गुरुदेव कालुसिंग बाबा होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्व प्रचारक सौरभ नेवे तसेच ह.भ.प. भीमाशंकर गोस्वामी (नांदेड) उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संत-महंतांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर उपस्थित संत-महंतांचा तापी परिसर सकल हिंदू समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सौरभ नेवे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या कार्याचा आढावा घेत समाज संघटन, संस्कार आणि राष्ट्रनिर्माणातील योगदानावर सविस्तर मार्गदर्शन केले.
संमेलनाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रा आणि मोटारसायकल रॅलीमुळे निमगव्हाण परिसर भगवामय झाला. “जय श्री राम”, “भारत माता की जय” आणि “वंदे मातरम्” या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
कार्यक्रमात हनुमान चालीसा पुस्तिकेचे वाटप करण्यात आले आणि समारोपप्रसंगी सामूहिक हनुमान चालीसा पठण करण्यात आले. तसेच देशभक्तीपर गीत, सांस्कृतिक कार्यक्रम आणि बालकांनी साकारलेल्या ऐतिहासिक व पौराणिक भूमिका यामुळे वातावरण भारावून गेले.
या संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी तापी परिसरातील विविध गावांतील स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमानंतर सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
