भूमी अभिलेख कार्यालयाच्या कारभारावर गंभीर आरोप; शेतकऱ्याचा उपोषण ते देहत्याग आंदोलनाचा इशारा

जळगाव जामोद येथील भूमी अभिलेख कार्यालयाच्या कथित चुकीच्या शेत मोजणी व अभिलेख त्रुटींविरोधात एका शेतकऱ्याने उपोषणासह देहत्याग आंदोलनाचा इशारा दिला आहे.

भूमी अभिलेख कार्यालयाच्या कारभारावर गंभीर आरोप; तीन वर्षांपासून न्याय न मिळाल्याने शेतकऱ्याचा उपोषणाचा निर्णय.

जळगाव जामोद येथील भूमी अभिलेख कार्यालयाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत एका शेतकऱ्याने उपोषणासह देहत्याग आंदोलनाचा इशारा दिला आहे. पिंप्री खोद्री शिवारातील गट क्रमांक ३६ च्या शेत मोजणी प्रकरणात गेल्या तीन वर्षांपासून न्याय मिळत नसल्याचा आरोप करत संबंधित शेतकऱ्याने उपविभागीय अधिकारी, जळगाव जामोद यांना निवेदन सादर केले आहे.

प्राप्त माहितीनुसार, पिंप्री खोद्री शिवारातील सर्वे क्रमांक १८ व २० मधील गट क्रमांक ३६ या शेताची हद्द कायम करून देण्यासाठी संबंधित शेतकऱ्याने दि. ६ जून २०२३ रोजी भूमी अभिलेख कार्यालय, जळगाव जामोद येथे अधिकृत मोजणी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर दि. २२ डिसेंबर २०२३ रोजी शेताची मोजणी करण्यात आली. मात्र, ही मोजणी अर्धवट आणि चुकीची असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार, मोजणीनंतर मिळालेल्या ‘क प्रत’ मध्ये एका बाजूच्या मोजमापाची माहितीच नमूद करण्यात आलेली नव्हती. अनेक वेळा पाठपुरावा करून तब्बल सहा महिन्यांनंतर ही प्रत उपलब्ध करून देण्यात आली. याबाबत लेखी तक्रार दाखल केल्यानंतर पुन्हा एकदा भूकरमापक शेतात आले आणि नव्याने मोजणी करण्यात आली. त्यानंतर दि. १७ सप्टेंबर २०२५ रोजी सुधारित ‘क प्रत’ देण्यात आली.

मात्र, सुधारित क प्रतीमध्येही अनेक गंभीर त्रुटी असल्याचा दावा शेतकऱ्याने केला आहे. शेताचा आकार, क्षेत्रफळातील तफावत, तसेच हद्दीच्या खुणा जोडणाऱ्या बांधाची जागा बदलल्यामुळे सुधारित अभिलेख मूळ नोंदींशी जुळत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या सुधारित क प्रतीमध्ये तब्बल आठ ठळक त्रुटी असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी गेल्या तीन वर्षांपासून भूमी अभिलेख कार्यालयाकडे सातत्याने लेखी तक्रारी करूनही योग्य न्याय मिळाला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. उलट प्रत्येक वेळी दिशाभूल करणारे तोंडी व लिखित आदेश देण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

शेतकऱ्याने आणखी गंभीर आरोप करत सांगितले की, दि. १७ सप्टेंबर २०२५ रोजी सुनावणीवेळी सुधारित क प्रत मिळाल्याची सही घेतली गेली आणि त्याच सहीच्या आधारे शेत मोजणीचे प्रकरण निकाली काढण्यात आले. माहिती अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांमधून हा प्रकार उघड झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. तक्रारींवर कोणतीही ठोस कार्यवाही न करता त्या दप्तरी दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

या सर्व प्रकारामुळे मानसिक त्रास सहन करावा लागत असून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच शेताची कायदेशीर व अचूक मोजणी करून योग्य अभिलेख द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

यासाठी संबंधित शेतकऱ्याने दि. २८ मे २०२६ पासून आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला असून त्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आले आहे :

📌 आंदोलनाचे वेळापत्रक :

  • २८ मे २०२६ – लाक्षणिक उपोषण
  • २९ मे २०२६ – अन्नत्याग उपोषण
  • ३० मे २०२६ – जलत्याग उपोषण
  • ३१ मे २०२६ – देहत्याग उपोषण

सदर प्रकरण गांभीर्याने घेऊन संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी आणि शेतकऱ्याला न्याय द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!