नंदुरबार जिल्ह्यात डायल 112 चा गैरवापर महागात; दारूच्या नशेत खोटा कॉल करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा सुनावली.
आपत्कालीन सेवा म्हणून सुरू करण्यात आलेल्या डायल 112 या सुविधेचा विनाकारण वापर करणाऱ्या एका इसमाला न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. धडगाव पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात न्यायालयाने आरोपीस दंडाची शिक्षा ठोठावल्याने आपत्कालीन यंत्रणेचा गैरवापर करणाऱ्यांसाठी हा इशारा मानला जात आहे.
पोलिस अधीक्षक कार्यालय, नंदुरबार यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, धडगाव पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल प्रतीक सुनील पिंपरे हे 28 एप्रिल 2022 रोजी डायल 112 एमडीटी बीट मार्शल-2 या पथकावर ड्युटीवर होते. त्यावेळी सायंकाळी सुमारे 5.45 वाजता डायल 112 वर एका व्यक्तीकडून फोन करून जिल्हा परिषद शाळेजवळ नारसिंग नावाचा व्यक्ती शिवीगाळ करून त्रास देत असल्याची तक्रार करण्यात आली होती.
तक्रारीची गंभीर दखल घेत पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळी पोहोचल्यावर संबंधित इसम सार्वजनिक ठिकाणी मोठमोठ्याने आरडाओरडा करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्याला विचारपूस केली असता त्याने आपले नाव नारसिंग असल्याचे सांगितले. तसेच डायल 112 वर कॉल आपणच केल्याचेही कबूल केले.
मात्र, पोलिसांनी कॉल करण्यामागचे कारण विचारले असता संबंधित इसम दारूच्या नशेत असल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळी प्रत्यक्षात कोणतीही गंभीर घटना घडलेली नसताना विनाकारण पोलिसांना त्रास देण्याच्या उद्देशाने त्याने डायल 112 वर कॉल केल्याचे समोर आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालातही संबंधित इसमाने मद्यसेवन केल्याचे स्पष्ट करण्यात आले.
या प्रकरणी नारसिंग बोंडा पराडके (वय 32, रा. गोयखा कामोदपाडा, ता. धडगाव, जि. नंदुरबार) याच्याविरुद्ध धडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 126/2022 दाखल करण्यात आला होता. त्याच्यावर भारतीय दंड विधान कलम 182, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 85(1) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 110, 112 आणि 117 अन्वये कारवाई करण्यात आली.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक स्वप्नील रमेश्वर गोसावी यांनी केला. तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. प्रकरणाची सुनावणी प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी, धडगाव यांच्या न्यायालयात झाली. सुनावणीदरम्यान फिर्यादी आणि तपास अधिकाऱ्यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.
साक्षीपुरावे आणि उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे न्यायालयाने आरोपी नारसिंग बोंडा पराडके याला दोषी ठरवले. न्यायालयाने महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 110 आणि 112 अंतर्गत दोष सिद्ध झाल्याने अधिनियम कलम 117 नुसार प्रत्येकी 200 रुपये दंड अशी एकूण 400 रुपयांची शिक्षा सुनावली.
या खटल्यात सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील अॅड. धर्मसिंग वळवी यांनी कामकाज पाहिले. तसेच मुख्य पेरी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक हेमंत मोहिते, पेरी अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल देवमन चौधरी आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल शैलेन्द्र प्रकाश जाधव यांनी सहकार्य केले.
पोलिस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, डायल 112 ही सेवा केवळ आपत्कालीन परिस्थितीतच वापरावी. खोटी माहिती देणे किंवा विनाकारण कॉल करून पोलिस यंत्रणेचा वेळ व संसाधने वाया घालवणे हा कायद्याने गुन्हा असून अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
