“जळगाव जिल्हा मनीयार बिरादरीची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न; १५ महत्त्वपूर्ण ठरावांना एकमताने मंजुरी”

चिनावल (ता. रावेर) येथे आयोजित जळगाव जिल्हा मनीयार बिरादरीच्या २८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जिल्हाध्यक्ष फारुख शेख यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले.

फारुख शेख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मनीयार बिरादरीच्या वार्षिक सभेत सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली.

 जळगाव जिल्हा मनीयार बिरादरीची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा जिल्हाध्यक्ष फारुख शेख यांच्या अध्यक्षतेखाली चिनावल तालुका रावेर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. जिल्हाभरातून मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या सभासदांच्या सहभागामुळे सभा ऐतिहासिक ठरली. बिरादरीच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि संघटनात्मक प्रगतीसाठी एकूण १५ महत्त्वपूर्ण ठरावांना एकमताने मंजुरी देण्यात आली.

सभेतील सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे साखरपुडा व विवाह सोहळ्यांसाठी आचारसंहितेची मंजुरी. समाजात वाढता खर्च, दिखाऊपणा आणि अनावश्यक रूढींना आळा घालण्यासाठी साधेपणा, पारदर्शकता आणि सामाजिक जबाबदारी यांवर आधारित आचारसंहिता स्वीकारण्यात आली. तसेच पती-पत्नीमधील वैवाहिक मतभेद न्यायालयात जाण्यापूर्वी स्थानिक सलोखा समितीमार्फत सोडविण्याला प्राधान्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

महिलांच्या स्वावलंबनासाठी विशेष रोजगाराभिमुख उपक्रम राबविणे, युवकांना कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे आणि समाजातील गरजू घटकांसाठी विविध कल्याणकारी योजना सुरू करण्याबाबतही सकारात्मक निर्णय घेण्यात आले.

सभेत सन २०२५-२६ चा वार्षिक अहवाल, जमाखर्च, अंदाजपत्रक, लेखापरीक्षक नियुक्ती, सभासद याद्या अद्ययावत करणे, संचालकांची अनुपस्थिती माफ करणे आदी नियमित विषयांना मंजुरी देण्यात आली. तसेच आगामी कालावधीसाठी निवडणूक प्रक्रियेसंदर्भात पाच सदस्यीय निवडणूक समितीला मान्यता देण्यात आली.

विविध समित्यांची स्थापना

पुढील पाच वर्षांसाठी बिरादरीच्या कार्याला अधिक गती देण्यासाठी शैक्षणिक, वैद्यकीय, कायदेशीर, सामाजिक, राजकीय, मॅरेज ब्युरो आणि महिला सक्षमीकरण आदी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली. या समित्यांवर सदस्यांची नियुक्ती करण्याचे अधिकार सभेने जिल्हाध्यक्ष फारुख शेख यांना बहाल केले.

अनेक मान्यवरांनी मांडले विचार

सभेत सादिक टेलर (न्हावी), असलम सर व जाकिर शेख,(साकली) शब्बीर सर अडावद, हकीम चौधरी (मुक्ताईनगर), कलीम मेंबर (फैजपूर), मुनाफ शेख (जामनेर), हाफिज शेख व करीम मेंबर (यावल), डॉ फारुक शेख (मेहुणबारा) शफी शेख (कजगांव)सैयद चांद, ताहेर शेख, डॉ फिरोज कासार, अकील शेख , जुलकर नैन, रऊफ टेलर, अल्ताफ शेख (जळगाव) यांच्यासह अनेक मान्यवरांनी समाजाच्या प्रगतीसाठी आपले विचार मांडले.

बिरादरी म्हणजे सर्वांगीण विकास – शेख

आपल्या अध्यक्षीय भाषणात फारुख शेख यांनी सांगितले की, “मनीयार बिरादरीला केवळ सामाजिक संघटना न ठेवता शिक्षण, रोजगार, कायदेशीर मार्गदर्शन आणि सामाजिक नेतृत्व निर्माण करणारी प्रभावी चळवळ बनविण्याचा आमचा संकल्प आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक घटकाला सोबत घेऊन काम केले जाईल.”

सभेची सुरुवात हाफीज समीर शेख यांच्या कुराण पठणाने झाली सभेपूर्वी चे संचालन ॲड अमीर शेख यांनी केले तर सभेची विषय पत्रिका व वार्षिक अहवाल वाचन सचिव अजित शेख यांनी केले. सभेचा समारोप रफिक खान चाळीसगाव यांच्या दुवा ने करण्यात आला 

सभेचे यशस्वी आयोजन चिनावल मनियार बिरादरी चे अध्यक्ष अब्दुल रऊफ यांच्या नेतृत्वात करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!