जळगाव येथे शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंग देओल यांची झांबरे विद्यालयाला सदिच्छा भेट. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना दिली प्रेरणादायी उत्तरे.
महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंग देओल यांनी के. सी. ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयाला सदिच्छा भेट देत शाळेतील शैक्षणिक वातावरण, विविध सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या विविध प्रश्नांना प्रेरणादायी उत्तरे दिली.
देओल यांच्यासोबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव तुषार महाजन, नाशिक विभागाचे उपसंचालक संजय कुमार राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश पाटील, गटशिक्षणाधिकारी तडवी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे (डाएट) प्राचार्य डॉ. अनिल झोपे, अधिव्याख्याता चंद्रकांत साळुंखे तसेच शालेय पोषण आहार अधीक्षक मगर उपस्थित होते.
विद्यालयात आगमन झाल्यानंतर के. सी. ई. सोसायटीचे संचालक डॉ. ए. आर. राणे आणि मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे यांनी मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले.
ग्रंथालय, प्रयोगशाळांची पाहणी
मान्यवरांनी शाळेतील ग्रंथालय, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांसाठी उपलब्ध सुविधांची पाहणी केली. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि शिक्षकांचे कार्य पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी शिक्षक तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधत शाळेच्या शैक्षणिक वातावरणाची माहिती घेतली.
‘अपयश आले तरी खचू नका’
विद्यार्थ्यांशी झालेला थेट संवाद या भेटीचे विशेष आकर्षण ठरले. विद्यार्थिनी रिया पाटील हिने, “आपण शिक्षण सचिव पदापर्यंत पोहोचताना कधी अपयशाचा सामना केला का? त्या वेळी आपण काय केले?” असा प्रश्न विचारला.
यावर देओल यांनी आपल्या अनुभवांचा संदर्भ देत अपयश प्रत्येकाच्या आयुष्यात येत असते; मात्र त्यातून खचून न जाता सातत्याने प्रयत्न करत राहणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. ध्येय निश्चित करून त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करावे, अपयशातून शिकावे आणि पुढील प्रयत्न सुरू ठेवावेत. सातत्यपूर्ण प्रयत्न आणि ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवल्यास यश मिळते, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
क्रीडा क्षेत्रातही संधींची कमतरता नाही
लौकिक ढगे याने क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याबाबत प्रश्न विचारला. यावर क्रीडा क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी असून मेहनत, सातत्य, शिस्त आणि समर्पण आवश्यक असल्याचे देओल यांनी सांगितले. क्रीडा क्षेत्रातील स्पर्धा मोठी असल्याने अधिक मेहनत घेण्याची तयारी ठेवावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. आगामी कॉमनवेल्थ स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर क्रीडा क्षेत्रातील संधींची माहितीही विद्यार्थ्यांना देण्यात आली.
‘एआयमुळे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील’
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे भविष्यात नोकऱ्यांची संख्या कमी होईल का, असा प्रश्न केतन पाटील याने उपस्थित केला. यावर देओल यांनी संगणकाच्या आगमनाच्या वेळीही नोकऱ्या कमी होतील अशी भीती व्यक्त केली जात होती; मात्र त्यातून रोजगाराची अनेक नवीन क्षेत्रे निर्माण झाली, याकडे लक्ष वेधले.
त्याचप्रमाणे कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य आणि सकारात्मक वापर केल्यास रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात. तंत्रज्ञानाचा उपयोग जनहितासाठीही मोठ्या प्रमाणावर करता येऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
पालकांशी संवाद साधण्याचा सल्ला
वैष्णवी सोनवणे हिने आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यास आई-वडील कधी कधी विरोध करतात, अशावेळी काय करावे, असा प्रश्न विचारला. यावर पालक आपल्या मुलांनी सुरक्षित राहावे, योग्य मार्गाने जावे आणि योग्य निर्णय घ्यावेत, यासाठीच प्रयत्न करत असतात, असे देओल यांनी सांगितले.
आपल्या वयातील अनुभवाच्या मर्यादेमुळे एखादी गोष्ट योग्य वाटू शकते; मात्र पालकांना त्यांच्या अनुभवातून त्यातील योग्य-अयोग्य बाबी अधिक स्पष्टपणे समजू शकतात. त्यामुळे आपल्या इच्छांविषयी पालकांशी मोकळेपणाने संवाद साधावा आणि त्यांना विश्वासात घ्यावे, असा सल्ला त्यांनी दिला. 
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांमधून त्यांची जिज्ञासा, भविष्याविषयीची उत्सुकता आणि बदलत्या जगाविषयीची जाण दिसून आली. अपयशावर मात करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे, क्रीडा क्षेत्रात मेहनत घेणे, कृत्रिम बुद्धिमत्तेकडे संधी म्हणून पाहणे आणि पालकांशी संवाद साधणे, असे विविध सकारात्मक संदेश या संवादातून विद्यार्थ्यांना मिळाले.
या भेटीच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे, ज्येष्ठ शिक्षक दिगंबर पाटील, प्रतिभा लोहार, महेंद्र नेमाडे, निर्मल चतुर, चंद्रकांत कोळी, रोहिणी पाटील, नेमीचंद झोपे, विवेक मोरे आणि संदेश करलकर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
प्रधान सचिव रणजीत सिंग देओल आणि शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची विद्यालयाला झालेली ही भेट शाळेसाठी गौरवास्पद ठरली. विद्यार्थ्यांशी झालेल्या मनमोकळ्या संवादामुळे त्यांच्यात आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत झाली. ज्ञान, जिज्ञासा, प्रयत्न, तंत्रज्ञान आणि सकारात्मक विचार यांच्या बळावर उज्ज्वल भविष्य घडवावे, हा संदेश या भेटीतून अधोरेखित झाला.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
