जळगाव मनपाच्या जागेवर अनधिकृत ताब्याचा प्रयत्न हाणून पाडला; ॲड. पियुष पाटील यांच्या पाठपुराव्याला यश ;रात्रीतून भिंत तोडून भूखंड बळकावण्याचा डाव फसला, ‘लँड माफिया’च्या हालचालींवर प्रशासनाची कारवाई

इंडियन रेडक्रॉस सोसायटीजवळील महानगरपालिकेच्या मौल्यवान भूखंडावर रात्रीतून कब्जाचा प्रयत्न उधळून लावत प्रशासनाने मालकी हक्काचा फलक लावला; ॲड. पियुष पाटील यांच्या पाठपुराव्याला यश.

जळगावात ‘लँड माफिया’चा डाव फसला! मनपाच्या मध्यवर्ती भूखंडावर बेकायदेशीर ताबा रोखण्यासाठी प्रशासनाने लावला मालकी हक्काचा फलक.

शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या महानगरपालिकेच्या मालकीच्या मौल्यवान खुल्या भूखंडावर बेकायदेशीर ताबा मिळवण्याचा प्रयत्न सामाजिक कार्यकर्ते ॲड. पियुष नरेंद्र अण्णा पाटील यांच्या सतर्कतेमुळे फसला. इंडियन रेडक्रॉस सोसायटी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शेजारी असलेल्या या जागेवर रात्रीतून संरक्षण भिंत तोडून ताबा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित भूखंड अनेक वर्षांपूर्वी नर्सिंग होम कॉलेजसाठी सिव्हिल हॉस्पिटलला देण्यात आला होता. मात्र, त्या ठिकाणी कोणतेही बांधकाम न झाल्याने महानगरपालिकेने ही जागा पुन्हा आपल्या ताब्यात घेतली होती. असे असतानाही पार्किंगसाठी जागा मिळवण्याच्या उद्देशाने काहींनी ‘लँड माफिया’ पद्धतीचा अवलंब करत रात्रीतून संरक्षण भिंत तोडून जेसीबीच्या साहाय्याने अनधिकृत काम सुरू केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ही बाब लक्षात येताच ॲड. पियुष पाटील यांनी महानगरपालिका प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल करत आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहत प्रशासनाकडे संबंधित कागदपत्रे आणि पुराव्यांच्या आधारे जोरदार बाजू मांडली.

कारवाईदरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील काही डॉक्टरांनी ही जागा वादग्रस्त असल्याचा दावा केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, मनपा अधिकाऱ्यांकडे आवश्यक कागदपत्रांची स्पष्टता नसताना ॲड. पाटील यांनी स्वतःकडील पुरावे सादर करून प्रशासनाला ठाम भूमिका घेण्यास भाग पाडले.

अखेरीस महानगरपालिकेने संबंधित जागेवर आपल्या मालकीचा फलक लावून भूखंडावरील ताबा स्पष्ट केला. या कारवाईमुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील महत्त्वाचा भूखंड सुरक्षित झाल्याचे मानले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!