शिक्षणाच्या मूलभूत अधिकाराच्या रक्षणासाठी भारतीय विद्यार्थी मोर्चाचे धरणे आंदोलन ;शिक्षणाचे खासगीकरण थांबविणे, समान शिक्षण व्यवस्था लागू करणे आणि विविध परीक्षा गैरप्रकारांची चौकशी करण्याची मागणी

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय विद्यार्थी मोर्चा आणि भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने शिक्षणाचा मूलभूत अधिकार, समान शिक्षण व्यवस्था, परीक्षा गैरप्रकारांची चौकशी आणि शिक्षणाचे खासगीकरण थांबविण्यासह विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.

ईव्हीएम पद्धतीत सुधारणा, नीट पेपरफुटी आणि एनटीएची चौकशी, शिक्षक टीईटी व रिक्त पदांची भरती यासह विविध मागण्यांसाठी भारतीय विद्यार्थी मोर्चाचे जळगावमध्ये धरणे आंदोलन.

 केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांमुळे संविधानाने नागरिकांना दिलेल्या शिक्षणाच्या मूलभूत अधिकाराची पायमल्ली होत असल्याचा आरोप करत भारतीय विद्यार्थी मोर्चा आणि भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने गुरुवारी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. नवीन शैक्षणिक धोरणामुळे बहुजन, वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांचे मोफत शिक्षण धोक्यात येत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

भारतीय विद्यार्थी मोर्चाचे राष्ट्रीय संरक्षक तथा भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये आंदोलनाचा दुसरा टप्पा आयोजित करण्यात आला. जळगावातील आंदोलनाचे नेतृत्व भारतीय विद्यार्थी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रद्युम्न वारडे आणि भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष देवानंद निकम यांनी केले.

ईव्हीएम आणि नीट परीक्षेतील कथित गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी

आंदोलनादरम्यान मतदान प्रक्रियेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम ठेवण्यासाठी ईव्हीएम पद्धतीत तातडीने सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली.

तसेच नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या प्रकरणाची आणि राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात एनटीएची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटना रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली.

शिक्षण संस्थांचे खासगीकरण थांबविण्याची मागणी

शिक्षण क्षेत्रातील खासगीकरण थांबवावे आणि खासगी क्षेत्रातही आरक्षण लागू करावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. तसेच दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित मारहाणीच्या घटनेची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.

समान शिक्षण व्यवस्था लागू करण्यावर भर

राष्ट्रीय शिक्षण धोरणात विद्यार्थीहिताच्या दृष्टीने आवश्यक बदल करण्यात यावेत, देशभरात सर्वांसाठी समान शिक्षण व्यवस्था लागू करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

याशिवाय २०११ पूर्वी सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा घेण्यात यावी, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विभागांमधील रिक्त पदांवर तातडीने नोकरभरती करावी, अशाही मागण्या करण्यात आल्या.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

आंदोलनानंतर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. शिक्षणाचा मूलभूत अधिकार, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित आणि सामाजिक न्यायाच्या प्रश्नांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.

या आंदोलनात सुमित्र अहिरे, सुनील देहडे, खुशाल सोनवणे, प्रा. डॉ. प्रकाश कांबळे, प्रा. डॉ. एस. एस. राणे, इंजि. डी. एन. पाटील, प्रा. एन. व्ही. भारंबे, आकाश लोंढे, सुमित भालेराव, मुकेश सावकारे, मयूर तायडे यांच्यासह विद्यार्थी, प्राध्यापक, पालक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!