जळगावच्या पाचोरा तालुक्यात तांदळाचा संशयास्पद साठा जप्त. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची तपासणी; सार्वजनिक वितरण व्यवस्थेशी संबंधाबाबत पुढील चौकशी सुरू.
अन्न व औषध प्रशासनाला प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे पाचोरा तालुक्यातील भोकरी, वरखेडी-पिंपळगाव रोड, भवरखेड येथील मे. श्री महासर माता राईस मिल येथे दि. ७ ते ९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत अचानक तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेशी संबंधित असल्याचा संशय असलेला फोर्टीफाइड तांदूळ आढळून आल्याने प्रशासनाने मोठी कारवाई केली.
तपासणीदरम्यान एकूण सहा अन्न नमुने घेण्यात आले असून, तब्बल २,९६,४७६ किलो तांदळाचा साठा, अंदाजे ७८,६३,१५० रुपये किमतीचा, संशयावरून जप्त करण्यात आला आहे.
विविध प्रकारच्या तांदळाचा समावेश
जप्त करण्यात आलेल्या साठ्यामध्ये ६४,५४६ किलो फोर्टीफाइड राईस, १,३७,९९६ किलो ब्रोकन राईस, १,९९६ किलो प्लेन राईस (डोमेस्टिक पर्पज) विनालेबल, ३,४४६ किलो ब्रोकन राईस (डोमेस्टिक पर्पज) मिसब्रँडेड, ८१,४९६ किलो राईस (Gustolo’s) एक्सपोर्ट आणि ६,९९६ किलो राईस (५% ब्रोकन) मलेशिया एक्सपोर्ट या साठ्याचा समावेश आहे.
संबंधित आस्थापना केंद्रीय अन्न परवानाधारक असल्याने या प्रकरणाची माहिती केंद्रीय अन्न परवाना प्राधिकरणास देण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेला फोर्टीफाइड तांदूळ महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेशी संबंधित आहे किंवा नाही, याबाबत अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडून पुढील तपासणी सुरू आहे.
मिलमध्ये अस्वच्छता; खरेदीची बिलेही सादर नाहीत
तपासणीदरम्यान राईस मिलमध्ये उंदराची विष्ठा, धूळ आणि कोळ्यांची जाळी आढळून आली. तसेच तांदूळ थेट जमिनीवर साठवून ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. तांदळाच्या पोत्यांवर उत्पादकाचा पत्ता नमूद नसणे आणि संबंधित तांदळाच्या खरेदीची बिले सादर न करणे, अशा त्रुटीही आढळून आल्या.
या सर्व बाबींच्या अनुषंगाने अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.
अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, सह आयुक्त (अन्न), ठाणे विभाग एस. एस. जाधव तसेच सह आयुक्त (अन्न), नाशिक विभाग मंगेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
जळगाव कार्यालयाचे सहायक आयुक्त (अन्न) दीनानाथ शिंदे, अन्न सुरक्षा अधिकारी शरद म. पवार, आकाश कै. बोऱ्हाडे, किशोर आ. साळुंखे आणि योगराज कि. सूर्यवंशी यांनी ही कारवाई केली.
नागरिकांनी संशयास्पद प्रकाराची माहिती द्यावी
जिल्ह्यात अथवा परिसरात अन्न भेसळीचा किंवा अन्न सुरक्षेशी संबंधित कोणताही प्रकार आढळून आल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर अथवा complaints.mahafda.in या तक्रार पोर्टलवर तक्रार नोंदवून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनातर्फे प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
