शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; नाशिक एसआयटीकडून जळगावसह ४८ शिक्षण अधिकारी-कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी नोटिसा, १८ एप्रिलपर्यंत हजर राहण्याचे आदेश.
राज्यासह जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडवणाऱ्या शालार्थ घोटाळा प्रकरणात नाशिक एसआयटीने तपासाची गती अधिक तीव्र केली असून जळगाव जिल्ह्यातील ४८ शिक्षण अधिकारी व कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी हजर राहण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या सर्वांना १८ एप्रिलपर्यंत नाशिक विभागीय मंडळ कार्यालयात हजर राहण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
माध्यमिक शिक्षण अधिकारी कल्पना चव्हाण यांच्या मार्फत या नोटिसा संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आल्या आहेत. यामध्ये जळगावच्या माध्यमिक शिक्षण विभागातील आजी-माजी शिक्षण अधिकारी, उपशिक्षण अधिकारी तसेच इतर कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, नाशिक आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २०२५ मध्ये जळगाव जिल्ह्यात येऊन दहा शाळांच्या मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांची सखोल चौकशी केली होती. या चौकशीदरम्यान अनेक महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली होती, ज्यामुळे संपूर्ण प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे.
तपासादरम्यान समोर आलेल्या धक्कादायक बाबींमुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे. काही शाळांनी कोणतीही योग्य पडताळणी न करता शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केल्याचे उघड झाले आहे. एवढेच नव्हे तर बनावट कागदपत्रांच्या आधारे तब्बल ६०० हून अधिक शिक्षकांचे बनावट आयडी तयार करून कोट्यवधी रुपयांचा पगार लाटल्याचा गंभीर प्रकारही तपासात निष्पन्न झाला आहे.
या संपूर्ण पार्श्वभूमीवर एसआयटीने आता संबंधित ४८ अधिकारी व कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी पाचारण केले असून, पुढील सुनावणीत आणखी गंभीर आणि धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील या घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
