उन्हाळ्यातील त्रास कमी करण्यासाठी महावितरणचा निर्णय; सकाळी ७ ते ११ दरम्यानच वीज देखभाल कामे.
वाढत्या उन्हाळी वीज मागणीच्या पार्श्वभूमीवर तसेच आगामी पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी राज्यभरात मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे वेगाने सुरू करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेत वीजदुरुस्तीची कामे आता सकाळी ७ ते ११ या वेळेतच करण्याचे स्पष्ट निर्देश मुख्यालयाकडून देण्यात आले आहेत.
महावितरणकडून सध्या वीजयंत्रणेची पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. याआधी ही कामे सकाळी १० ते दुपारी २ किंवा ४ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद ठेवून केली जात होती. मात्र उन्हाळ्यातील तीव्र उष्णता आणि नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन कामांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
मुख्यालयाच्या नव्या निर्देशानुसार, सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी ही कामे आता सकाळी ७ ते ११ या कालावधीतच पूर्ण करावीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच कामादरम्यान पर्यायी वीजपुरवठा उपलब्ध करून देणे आणि वीजग्राहकांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे पूर्वसूचना देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
मान्सूनपूर्व देखभाल कामांमध्ये वीजवाहिन्यांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडणे, इन्सुलेटर बदलणे, वितरण रोहित्रांची तपासणी, ऑइल फिल्टरेशन व अर्थिंग तपासणी, लाईटनिंग अरेस्टर बदलणे, तसेच जुन्या वीजतारा बदलणे यांचा समावेश आहे. यासोबतच वीजखांब व तारांचे मजबुतीकरण, झोळ काढणे आणि गंजलेले खांब बदलणे ही कामेही सुरू आहेत.
तसेच उपकेंद्रांतील ब्रेकर्स, बॅटरी प्रणाली आणि पॉवर ट्रान्सफॉर्मरची देखभाल केली जात असून फिडर पिलरची साफसफाई व इन्सुलेशन स्प्रे मारण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. या सर्व उपाययोजनांमुळे पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण कमी होईल, असा महावितरणचा दावा आहे.
या नियोजनामुळे उन्हाळ्यात नागरिकांना होणारा त्रास कमी होणार असून आगामी पावसाळ्यात वीजयंत्रणा अधिक सक्षम व सुरळीत राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
