जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अन्यायग्रस्त तृतीयपंथीचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तृतीयपंथीय व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले; दरम्यान, कारवाईदरम्यान तृतीयपंथीयांच्या कायदेशीर हक्कांचे पालन झाले का, यावर हक्क कार्यकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केले.

जळगावमध्ये तृतीयपंथीय व्यक्तीच्या आत्मदहनाच्या प्रयत्नानंतर पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह. तृतीयपंथी हक्क अधिकार संघर्ष समितीच्या शमिभा पाटील यांनी उपस्थित केले सवाल.

 जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन भवनासमोर सोमवारी दुपारी सुमारे ३ वाजता एका तृतीयपंथीय व्यक्तीने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ खळबळ उडाली.

कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हे नियोजन भवनात आयोजित कार्यक्रमासाठी उपस्थित असताना त्यांच्या वाहनासमोरच ही घटना घडल्याची माहिती आहे. त्यामुळे या घटनेची परिसरात चर्चा सुरू झाली. दरम्यान, पालकमंत्री गुलाबराव पाटील हे घटनास्थळावरून काही वेळ आधीच निघून गेले होते.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित तृतीयपंथीय व्यक्ती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेण्याचा आग्रह करत होती. पोलिसांनी भेटीस परवानगी नाकारल्यानंतर तिने अंगावर पेट्रोल ओतल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून तिला ताब्यात घेतले.

ताब्यात घेत असताना संबंधित व्यक्तीने मला फक्त महिला पोलीस अधिकारीच ताब्यात घेऊ शकतात. असा दावा केल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. मात्र घटनास्थळी महिला पोलीस अधिकारी किंवा महिला कर्मचारी उपस्थित असल्याचे दिसून आले नसल्याची माहिती आहे.

पोलिसांनी पाच ते सहा कर्मचाऱ्यांच्या मदतीने संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊन पोलिसांच्या वाहनातून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नेले. या कारवाईदरम्यान आवश्यकतेपेक्षा अधिक बळाचा वापर झाला का, तसेच तृतीयपंथीय व्यक्तीच्या अधिकारांचा आणि मानवी प्रतिष्ठेचा योग्य पद्धतीने विचार करण्यात आला का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

संबंधित व्यक्ती भुसावळ येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे. पुढील कारवाईसाठी तिला भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हापेठचे पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांनी दिली.

आत्मदहनाचा प्रयत्न रोखणे ही पोलिसांची तातडीची जबाबदारी असली तरी, संबंधित व्यक्तीला ताब्यात घेताना आवश्यक तेवढाच बळाचा वापर करण्यात आला का आणि तृतीयपंथीय व्यक्तींच्या कायदेशीर अधिकारांचे पालन झाले का, याची स्वतंत्रपणे चौकशी होण्याची गरज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

हा तर कायदेशीर हक्कांचा भंग ; शमिभा पाटील
 तृतीयपंथीय महिलेला पोलिसांनी अशा पद्धतीने उचलून नेणे हा तिच्या कायदेशीर हक्कांचा भंग आहे. संबंधित महिलेला ताब्यात घेताना महिला पोलीस कर्मचारी उपस्थित असणे आवश्यक होते. जळगाव पोलीस प्रशासनाने सामाजिक न्याय विभागाच्या आदेशानुसार तृतीयपंथीयांसाठी तक्रार निवारण समिती गठित केली आहे.

या समितीच्या अध्यक्षपदी जिल्हाधिकारी आहेत. मात्र, तृतीयपंथीयांच्या प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून अपेक्षित गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याचे चित्र वारंवार दिसत असल्याचा दावा पाटील यांनी केला.तृतीयपंथीय महिलांच्या बाबतीत अशा घटना घडत असतील तर गठित करण्यात आलेल्या तक्रार निवारण समितीची भूमिका काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तृतीयपंथीयांना कायद्याने समान हक्क आणि सन्मान मिळणे अपेक्षित आहे.

मात्र, प्रत्यक्षात त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्यास त्यांना न्याय मिळणार कसा ? असा प्रश्न तृतीयपंथी हक्क अधिकार संघर्ष समितीच्या महाराष्ट्र राज्य समन्वयक तथा वंचित बहुजन आघाडीच्या जळगाव जिल्हाध्यक्षा शमिभा पाटील यांनी स्थानिक समाचार डिजिटल न्युज नेटवर्कला प्रतिक्रिया देतांना उपस्थित केला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!