जळगावातील विविध पक्षांच्या उमेदवारांवर निवडणूक नियमभंगाची कारवाई होण्याचे संकेत; विभागीय आयुक्तांकडून अंतिम निर्णयाची प्रतीक्षा.
जळगाव महापालिका निवडणुकीत निवडणूक खर्चाचा तपशील वेळेत सादर न करणाऱ्या उमेदवारांवर आता अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निवडणूक आयोगाच्या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या १६ उमेदवारांविरोधात प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे सविस्तर प्रस्ताव पाठविल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार प्रत्येक उमेदवाराने निवडणुकीदरम्यान झालेल्या खर्चाचा संपूर्ण तपशील ठरावीक कालावधीत खर्च तपासणी कक्षाकडे जमा करणे बंधनकारक असते. मात्र, महापालिका निवडणुकीत २४ उमेदवारांनी निर्धारित मुदतीत खर्चाचा अहवाल सादर केला नव्हता.
प्रशासनाने प्राथमिक छाननीनंतर संबंधितांना नोटीस बजावत अंतिम संधी दिली होती. त्यानंतर आठ उमेदवारांनी खर्चाचा तपशील जमा केला. मात्र उर्वरित १६ उमेदवारांनी अद्याप कोणताही खुलासा किंवा खर्च अहवाल सादर केलेला नसल्याचे समोर आले आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने संबंधितांविरोधात विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविला असून, निवडणूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कठोर कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, संबंधित उमेदवारांना पुढील तीन वर्षांसाठी कोणतीही निवडणूक लढविण्यास बंदी घालण्यात येऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे.
या कारवाईमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेकांच्या राजकीय भवितव्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. खर्चाचा तपशील न सादर करणाऱ्यांमध्ये अपक्षांसह विविध राजकीय पक्षांशी संबंधित उमेदवारांचाही समावेश असल्याने या प्रकरणाला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, काँग्रेस, स्वराज्य शक्ती सेना तसेच इतर पक्षांच्या उमेदवारांची नावे असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
अपात्रतेच्या संभाव्य कारवाईच्या कक्षेत आलेल्या उमेदवारांमध्ये माजी नगरसेविका प्रिया मधुकर जोहरे, वृषाली अर्जुन भारुळे, अनिल रमेशचंद्र पगारिया, मंदा छोटूलाल सोनवणे, कौशल्याबाई उत्तम निकम, पद्माकर देवचंद सोनवणे, कलाबाई नारायण शिरसाठ, छाया फकिरा अडकमोल, चेतन नाना सोनवणे, शेख अहमद नूर लतीफ, जया रघुनाथ साळुंखे, डॉ. किशोर माळी, सोनम रोहिदास सोनवणे आणि अमोल रवींद्र चौधरी यांचा समावेश असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, विभागीय आयुक्तांकडून प्रस्तावाची छाननी करून अंतिम निर्णय घेतला जाणार असून, त्याआधी संबंधित उमेदवारांना पुन्हा स्पष्टीकरणाची संधी दिली जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
