चला !’काजवा स्नेही महोत्सव’ आयोजित करू या !

काजव्यांची जैवदीप्ती, त्यांचे नाजूक जीवनचक्र आणि निसर्ग संवर्धनाचा वैज्ञानिक संदेश देत ‘काजवा स्नेही महोत्सव’ साजरा करण्याचे आवाहन करताना पक्षीमित्र राजेंद्र गाडगीळ.

काजव्यांची जैवदीप्ती, त्यांचे जीवनचक्र आणि शाश्वत निसर्ग पर्यटनाचे नियम समजावून सांगत काजवा संवर्धनाचा प्रभावी संदेश देणारा विचारप्रवर्तक लेख.

 :- पक्षीमित्र राजेंद्र गाडगीळ 

8999809416, gadgilrd@gmail.com

चला, ‘काजवा स्नेही महोत्सव’ आयोजित करू या! या जाहिराती सोशल मेडियावर वाचण्यात येत आहेत. आज आपल्याला काजवे बघण्यासाठी खास ‘काजवा महोत्सव’ साजरा करावा लागतोय. मी जळगाव शहरात राहणारा. आमच्या लहानपणी आम्ही आमच्या गल्लीत मे महिन्याच्या शेवटी संध्याकाळ झाली, रात्र पडू लागली की गल्लीभर चमकणारे काजवे उडताना पाहिले आहेत. लहानपणाला सजेल असे काजवे पकडून डबीत ठेवून निरीक्षण केले आहे, रात्री चमकणारे काजवे दिवसा का चमकत नाहीत असा प्रश्न पडत असे. चमचमणाऱ्या या काजव्यांची बारीक दिव्यांची लड झाडावर पाहिली आहे. त्यामुळे चमचमणारे काजवे बघायला कोणाला आवडणार नाही? पण आज शहरात काय, गावाजवळील शेती परिसरात गेलो तरी काजवे दिसत नाहीत इतकी बिकट स्थिती झाली आहे. त्यामुळे मुलांना याविषयी गोष्टीतून किंवा हल्ली युट्यूब वर जाऊन चमचमणारे काजवे दाखवावे लागतात.

आज काजवे काही मोजक्या व आपल्या पासून खूप दूरवर असलेल्या विशिष्ठ परिसंस्थेत दिसतात पण आपल्या आवाक्यात ती जागा नसते त्यामुळे आपण हतबल असतो. आपल्यातील काजव्यांविषयीचे कुतूहल आणि हतबलता ओळखून पर्यटन संयोजक काजवा महोत्सव आयोजित करतात. यामुळेच काजवा महोत्सवास विरोध केलेला आपल्या कोणालाच आवडणार नाही आणि प्रश्न पडतो हे लोग काजवा महोत्सवास का विरोध करीत आहेत? विरोध करणे हे पर्यावरण वाद्यांचे नित्य फॅड आहे. ‘काजवा स्नेही महोत्सव’ (“Firefly Friendly Festival!”) याविषयी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मी सोशल मीडियावर जाहिराती वाचू लागलो आणि आपणही गेल्या ६० वर्षात काजवे पाहिलेले नाहीत त्यामुळे एखाद्या महोत्सवात सामील होऊ आस मनात विचार येत होता. पण अनेकांच्या या महोत्सवाला विरोध करणाऱ्या प्रतिक्रिया वाचल्या, बातम्या वाचल्या. पण मग, मनात प्रश्न आला की पर्यावरणवादी आणि निसर्गप्रेमी या महोत्सवांना नेमका का विरोध करीत आहेत? काय कारण आहे? आणि याचा शास्त्रीय शोध घेणे सुरू केले,हल्ली गुगल हाती असल्याने जगभरातील विविध लेख वाचणे सुलभ झाले आहे, आणि त्याप्रमाणे माहिती मिळवायला सुरवात केली.

ही माहिती वाचतांना माझ्या एक बाब लक्षात आली की ‘महोत्सव भरवूच नका’ अशी ताठर भूमिका न घेता, महोत्सव संयोजक आणि जे निरीक्षणासाठी जातात त्यांना या विरोधामागची शास्त्रीय कारणे समजून सांगणे गरजेचे वाटले.आज जे काजवा महोत्सव आयोजित होत आहेत, त्यात काजवे बघण्यास आलेले पर्यटक नेमक्या कोणत्या चुका करतात, त्यामुळे काजव्यांना आणि तेथील परिसंस्थेला नेमकी कोणती आणि कशी हानी पोहोचते, हे वैज्ञानिक पातळीवर काजवा संयोजक आणि निरीक्षक यांना समजून संगितले तर पर्यटकांचे कुतूहल शमवता येईल आणि त्यांना ‘सुजाण काजवा स्नेही निरीक्षक’ म्हणून सामील होता येईल. त्यासाठी काजवा म्हणजे काय, काजवा चमकण्यामागचे विज्ञान आणि त्यांचे जीवनचक्र, पर्यटकांच्या चुका आणि परिसंस्थेवर होणारे गंभीर परिणाम तसेच ‘काजवा स्नेही महोत्सव’ साजरा करण्यासाठी नियमावली का आणि कोणती असावी आणि यात संयोजकांची भूमिका कोणती असावी? यावर जाणीव जागृती होणे आवश्यक आहे. केवळ पर्यटन नसावे तर त्यात काजवे, परिसंस्था आणि निसर्ग साक्षरता ही भूमिका असावी यासाठी या मागील शास्त्रीय भूमिका,मुद्दे समजून घेणे गरजेचे आहे.

काजवा हा कीटक वर्गातील ‘लॅम्पिरिडी’ (Lampyridae) कुळातील एक भुंगा (Beetle) आहे. पर्यटकांना हे माहित असणे गरजेचे आहे की, काजव्यांचा हा प्रकाश म्हणजे त्यांच्या मनोरंजनाचा खेळ नसून, ती त्यांची प्रजनन प्रक्रिया (Mating Ritual) असते. काजव्यांच्या पोटामध्ये ‘लुसिफेरीन’ (Luciferin) नावाचे रसायन असते. जेव्हा हे रसायन हवेतील ऑक्सिजन आणि ‘लुसिफेरेज’ (Luciferase) नावाच्या विकराशी (Enzyme) संयोग पावते, तेव्हा रासायनिक प्रक्रियेतून उष्णतारहित प्रकाश निर्माण होतो आणि या क्रियेला विज्ञानात ‘जैवदीप्ती’ (Bioluminescence) (स्वतःच्या शरीरातून प्रकाश निर्माण करणारा) म्हणतात. न उडणारे किंवा उडणारे नर काजवे हवेत उडताना विशिष्ट लयीत प्रकाश चमकवून मादीला आकर्षित करतात, तर झाडाझुडपांमध्ये किंवा जमिनीवर बसलेली पंख नसलेली किंवा लहान पंख असलेली मादी काजवा त्याला त्याच लयीत प्रत्युत्तर देते, हा त्यांच्यातील मीलनाचा मूक संवाद असतो. काजव्यांचे जीवनचक्र अंडी, अळी (Larva), कोष (Pupa) आणि प्रौढ कीटक अशा चार टप्प्यांतून जाते. पावसाळ्याच्या सुरुवातीला मादी काजवा ओलसर जमिनीत, गवताच्या मुळाशी किंवा कुजलेल्या पालापाचोळ्यात अंडी घालते. या अंड्यातून निघणाऱ्या अळ्या, ज्यांना ‘ग्लो-वर्म’ म्हणतात, त्या शेतीसाठी अत्यंत फायदेशीर असतात, कारण त्या शेतातील पिकांचे नुकसान करणारे गोगलगाय (Snails) आणि इतर कीटक खाऊन जगतात; म्हणजेच, काजवे हे उत्तम ‘जैविक कीटकनाशक’ म्हणून निसर्गाचे संतुलन राखतात.

महोत्सवा दरम्यान अनियंत्रित पर्यटनामुळे काजव्यांच्या अधिवासावर अत्यंत घातक परिणाम होतात. पहिल्यांदा म्हणजे प्रकाश प्रदूषणामुळे (Light Pollution) त्यांच्या संवादात मोठा अडथळा येतो. कॅमेऱ्याचा फ्लॅश, मोबाईल स्क्रीन आणि पांढऱ्या प्रकाशाचे तीव्र टॉर्च यामुळे संपूर्ण परिसरात कृत्रिम प्रकाश तयार होतो आणि निसर्गाने काजव्यांना दिलेला अंधाराचा पडदा नष्ट झाल्यामुळे नर आणि मादी एकमेकांचे प्रकाशसंकेत ओळखू शकत नाहीत, परिणामी त्यांची प्रजनन प्रक्रिया खंडित होते व पुढील पिढी निर्माण न झाल्यामुळे त्या परिसरातील काजव्यांची संख्या कायमची घटते. तसेच पादचार्‍यांच्या अज्ञानामुळे काजव्यांच्या पुढील पिढीचा अंत होतो. काजवे पाहण्याच्या घाईत पर्यटक मुख्य वाटा सोडून जंगलात, झाडीझुडपांत आणि गवताळ भागात घुसतात, ज्यामुळे काजव्यांची जमिनीवर, पानांच्या मागे व पालापाचोळ्यात असलेली अंडी आणि अळ्या पर्यटकांच्या पायांखाली चिरडून जागीच नष्ट होतात व काजव्यांचे भविष्यच धोक्यात येते. याशिवाय रासायनिक आणि ध्वनी प्रदूषण (Chemical & Noise Pollution) देखील मोठ्या प्रमाणावर होते. पर्यटक अंगावर डास पळवणारे स्प्रे (Mosquito Repellents), तीव्र सेंट किंवा परफ्युम मारून जंगलात जातात आणि या रसायनांचा उग्र वास व हवेतील कण काजव्यांसारख्या संवेदनशील कीटकांच्या श्वासोच्छवासात अडथळा आणून त्यांना मारून टाकतात, तसेच पर्यटकांची हुल्लडबाजी, मोठमोठ्याने ओरडणे आणि वाहनांचे आवाज यामुळे काजवे व इतर वन्यजीव भयभीत होतात, तसेच काजवे पकडून बाटलीत भरणे, त्यांना स्पर्श करणे यांमुळे मानवी हातावरील घाम आणि सॅनिटायझर लागून हे कीटक तात्काळ मरतात.

या परिस्थितीवर मात करण्यासाठी ‘काजवा स्नेही महोत्सव’ साठी नियमावली (Code of Conduct) तयार करून ही नियमावली अत्यंत कडकपणे पाळणे बंधनकारक केले पाहिजे. यामध्ये प्रकाश आणि ऊर्जेचा वापरावर बंधन आणणे,नियंत्रित वापरकरण्याचे बंधन असावे. हे बंधन सर्वात महत्त्वाचे आहे, ज्यासाठी महोत्सवाच्या क्षेत्रात फ्लॅश फोटोग्राफीला शंभर टक्के बंदी असावी, पांढरे टॉर्च पूर्णपणे वर्ज्य करून अत्यंत गरजेच्या वेळी लाल रंगाचा जिलेटिन पेपर (Red Filter) लावलेले टॉर्च वापरावेत, कारण लाल प्रकाशचा काजव्यांच्या दृष्टीला त्रास होत नाही आणि परिसरात वावरताना मोबाईल सायलेंटवर ठेवून स्क्रीनचा ब्राइटनेस पूर्णपणे शून्य ठेवावा. काजवे असणाऱ्या परिसरात मोठ्या आवाजात बोलणे, गाणी लावणे यावर कायद्याने बंदी असावी व पर्यटकांनी शांतपणे निसर्गाचा अनुभव घ्यावा, तसेच काजव्यांना पकडणे, हातावर घेणे किंवा बाटलीत भरणे हा गंभीर गुन्हा मानला जावा. पर्यावरण आणि स्वच्छतेच्या दृष्टीने शून्य कचरा (Zero Waste) मोहीम राबवावी, ज्यामध्ये प्लास्टिक बॉटल्स, वेफर्सची पाकिटे परिसरात टाकण्यास सक्त मनाई असावी व पर्यटकांनी आपला कचरा स्वतःसोबत परत घेऊन जावा, काजवे बघायला जाताना कोणत्याही प्रकारचे स्प्रे, सेंट किंवा मॉस्किटो रिपेलेंट वापरू नये आणि परिसरात धुम्रपान (Smoking) व मद्यपानास पूर्ण बंदी असावी, कारण सिगारेटचा धूर काजव्यांसाठी विषारी ठरतो. वाहतूक आणि पादचारी नियंत्रणासाठी वाहनांची पार्किंग काजव्यांच्या प्रजननाच्या क्षेत्रापासून किमान १ ते २ किमी दूर असावी, कारण वाहनांचे हेडलाईट्स थेट झाडांवर पडल्यास काजव्यांची नैसर्गिक चमक नाहीशी होते, तसेच पर्यटकांनी मार्गदर्शकाने (Guide) ठरवून दिलेल्या पक्क्या वाटेवरूनच चालावे व झाडाझुडपांमध्ये किंवा गवत असलेल्या भागात उभे राहणे,पायी चालणे पूर्णपणे टाळावे.

काजवा महोत्सव आयोजित करणाऱ्या संयोजकांनी केवळ आर्थिक नफा न पाहता एक ‘निसर्ग साक्षरता मोहीम’ म्हणून याकडे पाहिले पाहिजे. काजवे दाखवण्यापूर्वी संयोजकांनी सर्व पर्यटकांना एकत्र जमवून प्रबोधन सत्राच्या माध्यमातून काजव्यांचे जीवनचक्र, त्यांचे निसर्गातील महत्त्व आणि विज्ञानाची सोप्या भाषेत माहिती दिली पाहिजे. स्थानिक प्रशासन,पर्यटन विभाग, वन्य विभाग यांनी एकाच रात्री हजारो पर्यटकांना सोडण्याऐवजी, त्या जागेच्या क्षमता(Carrying Capacity) निश्चित ठरवून, वेळापत्रक आखून त्या मर्यादितच पर्यटकांना प्रवेश दिला पाहिजे आणि स्थानिक रोजगार व जतन या तत्त्वानुसार या महोत्सवातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा काही भाग स्थानिक परिसंस्था टिकवण्यासाठी आणि काजव्यांच्या अधिवासाचे, म्हणजेच विशिष्ट झाडे व पाणथळ जागांचे जतन करण्यासाठी खर्च करावा. काजव्यांचा प्रकाश हा निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार आहे आणि आपण तिथे केवळ एक प्रेक्षक म्हणून जात नसून, निसर्गाच्या एका अत्यंत नाजूक आणि निरामय उत्सवाचे साक्षीदार होण्यासाठी जात आहोत, हा सुजाण तत्व प्रत्येकाने लक्षात ठेवला पाहिजे. निसर्गाचा आदर करून, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून जर आपण ‘काजवा स्नेही महोत्सव’ साजरा केला, तरच आपल्या पुढील पिढ्यांनाही गल्लीत आणि जंगलात हे चमचमणारे काजवे पाहायला मिळतील त्यामुळे अधिवासचे रक्षण होऊन काजवा आणि इतर जिवांचे जतन होईल.म्हणूनच निसर्गाचा आदर करा, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवा आणि काजव्यांचे अस्तित्व जपा!मग चला साजरा करूया ‘काजवा स्नेही महोत्सव’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!