विवाहातील सामाजिक बांधिलकीचा आदर्श; नवदांपत्याकडून वस्तीगृहातील गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

प्रतापपूर येथील कमलेश भाऊसाहेब गांगुर्डे व सौ. गायत्री गांगुर्डे यांनी विवाहानिमित्त जय भद्रा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वस्तीगृहातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, पाठ्यपुस्तके, दप्तर व अन्य शैक्षणिक साहित्याचे वाटप करून समाजसेवेचा प्रेरणादायी आदर्श घालून दिला.

प्रतापपूर येथील कमलेश भाऊसाहेब गांगुर्डे व सौ. गायत्री गांगुर्डे यांनी विवाहानिमित्त जय भद्रा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वस्तीगृहातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, पाठ्यपुस्तके, दप्तर व अन्य शैक्षणिक साहित्याचे वाटप करून समाजसेवेचा प्रेरणादायी आदर्श घालून दिला.

विवाहातील अनावश्यक खर्चाला फाटा देत समाजातील वंचित विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे करणाऱ्या या उपक्रमामुळे साक्री तालुक्यात एक सकारात्मक संदेश गेला असून, अशा प्रकारचा आगळावेगळा सामाजिक उपक्रम प्रथमच राबविण्यात आल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. नवदांपत्याने आपल्या आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात समाजसेवेच्या कार्यातून करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

जय भद्रा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेत अनेक वर्षांपासून अनाथ, निराधार व गरीब कुटुंबातील विद्यार्थी निवासी स्वरूपात राहून शिक्षण घेत आहेत. या मुलांच्या शिक्षण, निवास व संगोपनासाठी संस्था सातत्याने कार्यरत असून, नवदांपत्याने या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन दिलेली मदत अत्यंत मोलाची ठरली आहे.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले की, समाजातील प्रत्येक शुभकार्याला सामाजिक उत्तरदायित्वाची जोड मिळाल्यास अनेक गरजूंच्या जीवनात आनंद निर्माण होऊ शकतो. विवाह हा केवळ दोन व्यक्तींचा नव्हे, तर समाजाप्रती आपली बांधिलकी व्यक्त करण्याचाही एक सुंदर क्षण आहे, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले.

या प्रसंगी जय भद्रा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री. जितेंद्र गांगुर्डे, प्रतापूर गावाचे माजी सरपंच श्री. धनराज गांगुर्डे, सामाजिक कार्यकर्ते श्री. भूषण गांगुर्डे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष किसान सेल, धुळे जिल्हा कार्याध्यक्ष श्री. हर्षल ठाकरे, श्री. चंद्रकांत गांगुर्डे, श्री. सागर गांगुर्डे, श्री. सचिन गांगुर्डे, श्री. चेतन गांगुर्डे तसेच प्रतापूर गावातील तरुण, ग्रामस्थ व संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थितांनी नवदांपत्याचा सत्कार करून त्यांच्या या अभिनव सामाजिक उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. “आनंदाचा खरा उत्सव तोच, जो समाजातील गरजूंच्या चेहऱ्यावर हास्य फुलवतो,” हा संदेश देणारा हा उपक्रम साक्री तालुक्यासाठी प्रेरणादायी ठरला असून, भविष्यात इतर नवदांपत्यांनीही अशा सामाजिक उपक्रमांना प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!