जिजामाता माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना सायबर क्राईमविषयी मार्गदर्शन

एरंडोल येथील जिजामाता माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना सायबर क्राईम, ऑनलाइन फसवणूक आणि सुरक्षित डिजिटल व्यवहारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले; विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा बुकलेटचे वाटप. | स्थानिक समाचार | www.sthaniksamachar.com

जिजामाता माध्यमिक विद्यालय, एरंडोल येथे सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम; विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणुकीपासून बचावाच्या उपायांची माहिती आणि मार्गदर्शक बुकलेटचे वाटप.

 डिजिटल माध्यमांचा वाढता वापर आणि त्यासोबत वाढणाऱ्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षा व ऑनलाइन फसवणुकीबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने जिजामाता माध्यमिक विद्यालय, एरंडोल येथे सायबर क्राईमविषयी जनजागृतीपर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मोबाईल, सोशल मीडिया तसेच ऑनलाइन व्यवहार करताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थिनी कुमारी स्नेहल पाटील व कुमारी वैष्णवी पाटील यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांचे विविध प्रकार आणि त्यापासून बचाव करण्याच्या उपाययोजनांची माहिती दिली.

यावेळी सोशल मीडिया अकाउंट सुरक्षित ठेवणे, अनोळखी लिंकवर क्लिक न करणे, OTP व पासवर्ड कोणालाही न सांगणे, QR कोडच्या माध्यमातून होणारी फसवणूक टाळणे तसेच ऑनलाइन फसवणूक झाल्यास तातडीने योग्य ती कार्यवाही करण्याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली.

सायबर सुरक्षेचे मार्गदर्शक बुकलेट वाटप

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा आणि ऑनलाइन फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी मार्गदर्शक बुकलेटचे वाटप करण्यात आले. या बुकलेटमधील माहिती विद्यार्थ्यांना दैनंदिन डिजिटल व्यवहारांमध्ये सुरक्षितता राखण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. विद्यार्थ्यांनी बुकलेटमधील मार्गदर्शक सूचनांचा प्रत्यक्ष जीवनात वापर करावा, असे आवाहन करण्यात आले.

विद्यार्थ्यांनीही कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सायबर सुरक्षेशी संबंधित विविध प्रश्न विचारले. मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उदाहरणांसह उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन केले.

कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. प्रविण शंभू केदार तसेच ज्युनिअर क्लर्क श्री. आर. आर. वाघ उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता निर्माण करून त्यांना सुरक्षित डिजिटल व्यवहारांसाठी सक्षम करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!