स्क्रीनपासून निसर्गाकडे असा जेन झीचा प्रवास सुरू झाला आहे. BirdTok, पक्षीनिरीक्षण आणि आधुनिक ॲप्समुळे तरुणाईत निसर्गप्रेमाची नवी लाट.
कालच मी १५ ऑगस्ट २०२६ चा ‘द गार्डियन’ हे ऑनलाइन वृत्तपत्र वाचत होतो. त्यात त्यांचे ग्लोबल टेक्नॉलॉजी एडिटर डॅन मिलमो यांचा “BirdTok drives young people to birdwatching: It’s a desire for something real” हा लेख माझ्या वाचनात आला आणि मला तो खूपच नावीन्यपूर्ण आणि अभ्यासपूर्ण वाटला.
झाडांवर चालणारा पक्ष्यांचा किलबिलाट, पंखांची फडफड आणि हातात मोबाईल धरून पक्ष्यांचे आवाज टिपणारी तरुण मुले… हे चित्र आजकाल ब्रिटनसह जगभरातील बागांमध्ये आणि निसर्गरम्य ठिकाणी सर्रास पाहायला मिळत आहे. तंत्रज्ञान आणि निसर्ग यांच्या या अनोख्या संगमावर डॅन मिलमो यांनी या लेखात छान प्रकाश टाकला आहे.
डॅन मिलमो यांच्या मते, आजची तरुणाई सोशल मीडियावरील डिजिटल गोंधळ, वादग्रस्त मजकूर आणि ‘एआई’च्या (AI) आभासी दुनियेला पुरती कंटाळली आहे. म्हणूनच, त्यांना आता निसर्गाच्या सानिध्यात जाऊन काहीतरी खरं-खुरं, कानाला तृप्त करणारं आणि ‘ॲनालॉग’ अनुभव घेण्याची इच्छा आहे.
या अनुभवाच्या शोधातून ही मुले अब पक्षीनिरीक्षणाकडे (Birdwatching) वेगाने वळत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या या नव्या प्रवासात त्यांना मदत होतेय ती ‘टिक-टॉक’सारख्या सोशल मीडियावर गाजत असलेल्या ‘बर्डटॉक’ (BirdTok) या ट्रेंडची आणि पक्ष्यांचे आवाज ओळखून देणाऱ्या ‘मर्लिन’ (Merlin) सारख्या आधुनिक ॲप्सची!
”सोशल मीडिया म्हणजे केवळ टाईमपास रील्स आणि वेळ वाया घालवणं,” या जुन्या समजूती जेन झी मोडून काढत असून या तरुण पिढीने टिकटॉकचा वापर थेट निसर्गाशी जोडण्यासाठी सुरू केला आहे.
आकडेवारीनुसार, त्यांना दिसून आले की अवघ्या तीन महिन्यांत ब्रिटनमध्ये #birdwatching आणि #birdtok या हॅशटॅगच्या पोस्ट्स ३३ टक्क्यांनी वाढल्या आहेत, तर #birding च्या पोस्ट्समध्ये ४० टक्क्यांची भर पडली आहे. जागतिक स्तरावर तर या तिन्ही हॅशटॅगच्या व्हिडिओंनी तब्बल १० लाखांचा टप्पा पार केला आहे.
डॅन पुढे लिहितात—’स्टीव्हन’ नावाच्या एका माणसाळलेल्या सीगल (Seagull) पक्ष्याला माशाचा तुकडा भरवतानाच्या एका साध्या व्हिडिओला ५ कोटी २० लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे. तसंच ‘रॉयल सोसायटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ बर्ड्स’ (RSPB) च्या व्हिडिओंना वर्षभरात ९० लाख व्ह्यूज मिळाले, ज्यातील ३३ टक्के प्रेक्षक हे २४ वर्षांपेक्षा कमी वयाचे तरुण होते!
या अभूतपूर्व बदलाविषयी बोलताना डर्बीशायरचे ३३ वर्षीय पक्षीप्रेमी अन् टीव्ही संशोधक जॅक बॅडम्स म्हणतात, “लोकांना आता खऱ्या आणि नैसर्गिक गोष्टींची ओढ लागली आहे आणि त्यासाठी पक्षीनिरीक्षणासारखा दुसरा सुंदर मार्ग नाही.”
३ लाख फॉलोअर्स असलेले बॅडम्स हे ‘ब्रिटिश ट्रस्ट फॉर ऑर्निथॉलॉजी’च्या ३,००० पक्षी-‘रिंगर्स’पैकी एक आहेत. ते नित्यनेमाने पक्ष्यांच्या पायांत रिंग घालून त्यांच्या स्थलांतराचा आणि संख्येचा अभ्यास करतात. त्यांनी या विषयावर बनवलेल्या एका व्हिडिओला ७५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
विशेष म्हणजे, लोकांना कोणत्याही दुर्मिळ पक्ष्यांपेक्षा आपल्या घराभोवती सहज दिसणारे ब्लैकबर्ड्स (Blackbirds), ब्लू टिट्स किंवा चिमण्यांसारखे साधे तपकिरी पक्षी (ज्यांना पक्षीशास्त्रात ‘लिटल ब्राऊन जॉब्स’ म्हणतात) जास्त आवडतात. कारण या रोज दिसणाऱ्या पक्ष्यांशी ते पटकन आपलं नातं जोडू शकतात. निसर्गाविषयीची ही नवीन आवड रुजवण्यात आधुनिक तंत्रज्ञानाने एका ‘सर्जनशील किल्ली’ची भूमिका बजावली आहे, असे लेखकाचे निरीक्षण आहे.
यॉर्क येथील ३५ वर्षीय व्यावसायिक पक्षीशास्त्रज्ञ टिम जोन्स (ज्यांच्या ‘Begin Birding’ या इन्स्टाग्राम हँडलवर २,१०,००० फॉलोअर्स आहेत) सांगतात, “आधी पक्षीनिरीक्षणाकडे वृद्धांचा किंवा एक कंटाळवाणा छंद म्हणून पाहिले जायचे. पण सोशल मीडियाने या छंदाला एकदम ‘कूल’ आणि रंजक बनवले आहे.”
पक्ष्यांची गाणी ऐकून त्यांची जात अचूक ओळखणारे ‘मर्लिन’ (Merlin) सारखे ॲप्स तरुणांच्या हाती आल्यामुळे पक्षीनिरीक्षण आता अगदी सोपं आणि आनंददायी झालं आहे. या डिजिटल साधनांमुळे निसर्गाविषयीची सुप्त उत्सुकता जागी झाली असून तरुणांचे स्वतःचे छोटे-छोटे अभ्यासक आणि निसर्गप्रेमी गट तयार होत आहेत.
येत्या काळात १६ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर ब्रिटन सरकार मर्यादा आणण्याच्या विचारात आहे. पण तरीही, ‘ब्रिटिश ट्रस्ट फॉर ऑर्निथॉलॉजी’चे सॅम्युअल लेव्ही सांगतात की, ११ ते २५ वयोगटातील तरुणांसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या ‘बर्ड कॅम्प्स’ आणि निसर्ग भटकंतीची क्रेझ दिवसेंदिवस वाढतेच आहे.
RSPB चे सोशल मीडिया मॅनेजर जोशुआ एडवर्ड्स यांच्या मते, जास्तीत जास्त तरुण निसर्गाशी आणि वन्यजीवांशी जोडले जात आहेत, ही खूप दिलासादायक गोष्ट आहे.
शेवटी माणसाचे मन शांततेच्या शोधात निसर्गाच्या कुशीतच जाते, हेच या ट्रेंडवरून सिद्ध होते. आभासी स्क्रीनच्या जगातून बाहेर पडून ही नवी पिढी आता पक्ष्यांच्या किलबिलाटात स्वतःला शोधते आहे आणि त्यामुळे पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने हा एक खूप मोठा आशेचा किरण आहे.

राजेंद्र गाडगीळ हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक,शैक्षणिक, पर्यावरण आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष लेखनाच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी लेख प्रकाशित करतात.
मो. 8999809416, email- gadgilrd@gmail.com
