एनआयआरएफ रँकिंग कंत्राटीच्या भरवश्यावर, पूर्णवेळ भरतीत संधीची साशंकता: लेखक-नितीन लीलाबाई समाधान घोपे

“महाराष्ट्रातील अकृषी विद्यापीठांत प्राध्यापक भरती सुरू झाली असली तरी, एनआयआरएफ (NIRF) रँकिंगवर आधारित नवीन ६०-२०-२० गुणांकन पद्धतीमुळे वर्षानुवर्षे सेवा देणाऱ्या कंत्राटी प्राध्यापकांमध्ये संताप आणि साशंकता निर्माण झाली आहे. मुंबई-पुणे विद्यापीठांना झुकते माप मिळत असल्याने इतर विद्यापीठांतील उमेदवारांवर अन्यायाची भीती व्यक्त होत आहे.”

         संपूर्ण महाराष्ट्रातील अकृषी विद्यापीठातील प्राध्यापक भरतीला दोन ते अडीच वर्षानंतर दि. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी शासन निर्णयानंतर गतिमान झाली. कित्येक दशकांपासून अकृषी विद्यापीठातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक पदांच्या विविध विषयांची जवळपास ६० – ७० टक्के पदे सेवानिवृत्ती मुळे रिक्त झालेली आहेत. 

         राज्य सरकारने सन २०१५ पासून आर्थिक कारण देत पदभरतीवर अंकुश ठेवलेला होता, त्यानंतर नानाविध कारणांमुळे विद्यापीठातील प्राध्यापक पदभरती रखडत राहिली. दि. ३ नोव्हेंबर २०१८ रोजी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने शासन निर्णय काढून सर्व अकृषी विद्यापीठातील एकूण मंजूर पदांच्या ८० टक्केच्या मर्यादेपर्यंत ६७९ पदे भरण्यास मान्यता दिली; परंतु, जागतिक कोविड-१९ महामारीच्या प्रदीर्घ प्रादुर्भावामुळे आणि आरक्षण धोरणातील बदलामुळे ही पदभरती प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. 

         सन २०२३ मध्ये काही अकृषी विद्यापिठांनी प्राध्यापक पदभरतीची प्रक्रिया सुरू करू जाहिराती प्रकाशित केल्या; पण, काही विद्यापीठातील निवड प्रक्रियेत नियमावलीचा भंग आणि गैर प्रकार झाल्याबाबत मा. राज्यपाल कार्यालयाला लिखित तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे तत्कालीन राज्यपाल यांनी चौकशी करून सत्यता पडताळणी केल्यानंतर सर्व विद्यापीठातील प्राध्यापक पद भरती प्रक्रियेला परिपत्रक काढून स्थगिती दिली व सुधारित नियमावली तयार करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागासह सर्व कुलगुरूंना सूचना केल्या. त्यानुसार वेळोवेळी सुधारित शासन निर्णय निर्गमित केली गेली, पण त्यातील विरोधाभासामुळे त्यावरही आक्षेप नोंदविले गेले. त्यानंतर पुन्हा दि. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी नवीन शासन निर्णय निर्गमित करून ६० – २० – २० पद्धतीने निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याच्या स्पष्ट सूचना सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंना देण्यात आल्या; त्यानुसार जाहिरातींचे शुद्धिपत्रक काढून अर्जदारांना सुधारित नियमावलीनुसार अर्जात बदल करण्याचे आव्हान केलेले आहे.         

         नवीन नियमावलीनुसार प्रत्येक अर्जदाराच्या शैक्षणिक, अध्यापन आणि संशोधन कामगिरीला गुणांकन केले जाणार व हे सर्व कोणत्या विद्यापीठातून पूर्ण केलं? आणि त्या विद्यापीठाचे जागतिक, राष्ट्रीय आणि आंतरराज्यीय स्तरावरील एनआयआरएफ मानांकनावर विभागण्यात येणार; त्यानंतर अर्जदाराला मुलाखतीसाठी पात्र-अपात्र ठरविण्यात येईल.

           महाराष्ट्रातील अकृषी विद्यापीठात गेल्या कित्येक वर्षांपासून पूर्णवेळ प्राध्यापक भरती न झाल्यामुळे रिक्त पदावर कंत्राटी तत्वावर ११ महिन्याच्या काळासाठी ठोक मानधनावर सहाय्यक प्राध्यापक म्हणून तात्पुरत्या स्वरूपात निवड करण्यात येऊ लागली. अकृषी विद्यापीठातील जवळपास सर्वच जबाबदाऱ्या कंत्राटी प्राध्यापकांनी पूर्ण करून आपआपल्या विद्यापीठांचे मानांकन मिळवून ते टिकवून ठेवले आणि त्याच मानांकनाच्या आधारे आता होऊ घातलेल्या प्राध्यापक पदभरतीत अर्जदाराला गुणांकन दिले जाणार आहे. परंतु, ज्या कंत्राटी प्राध्यापकांनी विद्यापीठाला वेगवेगळे मानांकन मिळवून दिले, त्या कंत्राटी प्राध्यापकांना नवीन शासन निर्णयानुसार ६० – २० – २० पद्धतीने त्या त्या विद्यापीठात गुणांकन स्पर्धेत पिशाडीवर पडत असल्याचं चित्र दिसून येत आहे. उदा. एक अर्जदार मुंबई विद्यापीठातून आणि दुसऱ्या अर्जदाराने नागपूर विद्यापीठातून एकाच विषयात शिक्षण पूर्ण केलेलं असून दोघांनाही सारखेच गुण प्राप्त झालेले आहेत, दोघेही एकाच संवर्गाचे आहेत फक्त शिक्षण वेगवेगळ्या विद्यापीठातून घेतलेलं असल्यामुळे मुंबई विद्यापीठातील अर्जदाराला एकूण गुणांच्या १०० टक्के गुण ग्राह्य धरणार आणि नागपूर विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेल्या अर्जदाराला मिळालेल्या एकूण गुणाच्या ८० टक्केच गुण निवडीसाठी ग्राह्य धरण्यात येणार. दोन्ही अर्जदाराला गुण सारखे असून सुद्धा फक्त शिक्षण वेगवेगळ्या विद्यापीठातून घेतलेलं असल्यामुळे आणि एनआयआरएफ मानांकनात दोन्ही विद्यापीठे वेगवेगळ्या क्रमांकावर असल्यामुळे त्याचा फटका अर्जदाराला बसणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तसेच मुंबई व पुणे विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेल्या अर्जदारांना इतर सर्व विद्यापीठात सर्वाधिक गुण मिळतील आणि इतर विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेल्या अर्जदारांना मुंबई पुणे विद्यापीठाच्या तुलनेने एनआयआरएफ मानांकनामुळे १० – २० टक्के गुण कमी होतील. परिणामी, मुंबई पुणे विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेल्या अर्जदारांना प्राधान्य मिळेल. महाराष्ट्रातील इतर अकृषी विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेल्या अर्जदारांना मानांकनामुळे दुय्यम स्थानी ठेवले जाणार असल्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत. यावरून असे दिसून येते की, अकृषी विद्यापीठातील प्राध्यापक पदभरतीत फक्त आणि फक्त मुंबई पुणे येथील विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेल्या अर्जदारांनाच प्राधान्य मिळणार व उरलेल्या इतर अकृषी विद्यापीठातील अर्जदारांना दुय्यम स्थानी ठेवून अप्रत्यक्षरित्या डावलले जाणार. 

         कंत्राटी सहाय्यक प्राध्यापकांनी कित्येक वर्षापासून अकृषी विद्यापीठात कष्ट करून त्या त्या विद्यापीठाचे मानांकन टिकवून ठेवले, पण त्याच कंत्राटी प्राध्यापकांना होऊ घातलेल्या अकृषी विद्यापीठातील प्राध्यापक पद भरतीत एनआयआरएफ मानांकन पद्धतीमुळे डावलले जाण्याची भीती निर्माण झाली असून साशंकता वाढली आहे.

प्रा. नितीन लीलाबाई समाधान घोपे

राज्य समन्वयक, शिक्षणक्रांती अभियान

मो. 9921587937,

इमेल – ghope.nitin7@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!