खेडी-कानळदा परिसरात जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची नदीपात्राची प्रत्यक्ष पाहणी; अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर ‘झिरो टॉलरन्स’ची भूमिका.
जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी खेडी-कानळदा परिसरातील गिरणा नदीपात्राची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.
या पाहणीदरम्यान जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी दुचाकी, पायी तसेच वाहनातून नदीपात्रातील विविध भागांची पाहणी केली. संभाव्य अवैध वाळू उपशाची ठिकाणे, नदीपात्रातील सद्यस्थिती तसेच परिसरातील हालचालींबाबत संबंधितांकडून माहिती घेण्यात आली.
ग्रामस्थांशी साधला संवाद
नदीपात्राची पाहणी करताना दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खेडी आणि कानळदा परिसरातील ग्रामस्थांशी संवाद साधला. नदीपात्रातून अवैध वाळू उपसा किंवा वाहतूक होत असल्यास त्याबाबतची माहिती प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावी, असे आवाहन करण्यात आले.
तसेच परिसरातील समस्या, तक्रारी आणि अवैध वाळू उपशासंदर्भातील माहिती ग्रामस्थांकडून जाणून घेण्यात आली. यानंतर संबंधित अधिकारी आणि यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
अवैध वाळूला ‘झिरो टॉलरन्स’
अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची हयगय सहन केली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी मांडली.
अवैध वाळू उपसा किंवा वाहतुकीला कोणत्याही प्रकारे पाठबळ मिळता कामा नये. संबंधित महसूल व पोलीस यंत्रणांनी आपल्या कार्यक्षेत्रात अधिक सतर्क राहून अशा प्रकारांवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
नदीपात्रांवर प्रशासनाची करडी नजर
जिल्ह्यातील विविध नदीपात्रांमधून होणारा अवैध वाळू उपसा, वाहतूक आणि साठवणूक रोखण्यासाठी प्रशासनाकडून आगामी काळात कारवाई अधिक तीव्र करण्याचे संकेत या पाहणीमधून मिळाले आहेत.
जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी स्वतः नदीपात्रात जाऊन पाहणी केल्यामुळे संबंधित यंत्रणांमध्येही सतर्कता वाढली आहे. अवैध वाळू उपशाला आळा घालण्यासाठी महसूल आणि पोलीस विभागाने समन्वयाने काम करावे, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असा स्पष्ट संदेश या पाहणीतून देण्यात आला आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
