राष्ट्रीय शिक्षण धोरण, संशोधन, एआय, उद्योजकता आणि कौशल्य विकासावर भर देत सक्षम व रोजगारक्षम विद्यार्थी घडविण्याचा विद्यापीठाचा संकल्प.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने आपल्या ३६ वर्षांच्या वाटचालीत उच्च शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. विद्यापीठाने केवळ ज्ञान देणारी संस्था म्हणून न राहता विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत विविध संधी उपलब्ध करून देणारी संस्था म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुरेश गोसावी यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने शैक्षणिक, संशोधन, प्रशासकीय तसेच महाविद्यालयीन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना सन २०२५ चे उत्कृष्ट महाविद्यालय, उत्कृष्ट परिसंस्था, उत्कृष्ट प्राचार्य, उत्कृष्ट संचालक, उत्कृष्ट शिक्षक, उत्कृष्ट ग्रंथपाल, उत्कृष्ट शारीरिक शिक्षण संचालक तसेच उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी पुरस्कार प्रदान करण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रा. गोसावी बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी होते. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य संजय सुराणा, प्राचार्य महेंद्रसिंग रघुवंशी, प्राचार्य जगदीश पाटील, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. योगेश पाटील आणि वित्त व लेखा अधिकारी सीए रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.
बहिणाबाईंचे नाव विद्यापीठाला मिळणे अभिमानाची बाब
प्रा. सुरेश गोसावी यांनी विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव मिळणे ही अभिमानाची बाब असल्याचे नमूद केले. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानासोबत कौशल्याधारित शिक्षण मिळावे, यासाठी विद्यापीठाने प्रयत्नशील राहावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
जलसंकट, हवामान बदल, शेती, आरोग्य आणि तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांसमोरील आव्हानांवर संशोधन करण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी विद्यापीठातील संशोधक आणि विद्यार्थ्यांना या विषयांकडे गांभीर्याने पाहण्याचे आवाहन केले. बहिणाबाई चौधरी यांचा साहित्यिक वारसा आणि खान्देशची समृद्ध ज्ञानपरंपरा विद्यापीठ पुढे नेत असल्याचेही त्यांनी सांगितले.
संशोधनासोबत उद्योजकतेलाही प्रोत्साहन आवश्यक
अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी समर्पण, सातत्य आणि सामूहिक प्रयत्नांमुळे विद्यापीठाच्या प्रगतीला नवी दिशा मिळत असल्याचे सांगितले.
आय-केअरच्या सर्वेक्षणानुसार ‘पब्लिकेशन पर फॅकल्टी’ आणि ‘सायटेशन पर पब्लिकेशन’ या दोन्ही निकषांमध्ये विद्यापीठ राज्यात प्रथम क्रमांकावर असल्याचे त्यांनी नमूद केले.
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), हवामान बदल आणि तंत्रज्ञानातील वेगवान बदलांच्या पार्श्वभूमीवर संशोधन, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि मानवी मूल्यांचा समन्वय साधण्याची गरज असल्याचे प्रा. माहेश्वरी यांनी स्पष्ट केले. सक्षम, रोजगारक्षम आणि सुसंस्कृत विद्यार्थी घडविण्यावर विद्यापीठाचा भर राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दोन पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या माहितीपत्रकाचे विमोचन
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षणक्रमांतर्गत एम.ए. इतिहास तसेच एम.ए. संरक्षण व सामरिकशास्त्र या दोन पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश माहितीपत्रकाचे विमोचन करण्यात आले.
यामुळे विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेची आणि उपलब्ध शैक्षणिक संधींची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाला व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्य, विद्यापरिषद सदस्य, प्राचार्य, संस्थाचालक, प्रशाळा संचालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांनी केले. कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. विजय घोरपडे आणि खेमराज पाटील यांनी केले.
कार्यगौरव पुरस्कार वितरण सोहळा यशस्वी करण्यासाठी विविध समित्यांच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. पुरस्कारांच्या माध्यमातून विद्यापीठाच्या शैक्षणिक, संशोधन आणि प्रशासकीय क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यात आला.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
