भालोद येथे महिलांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रम ;विद्यार्थिनींकडून ऑनलाइन फसवणुकीपासून बचावासाठी मार्गदर्शन; हॅकरच्या मुखवट्याद्वारे प्रात्यक्षिकातून जनजागृती

भालोद येथे बचत गटातील महिलांना सायबर फसवणुकीपासून बचाव, OTP-KYC फ्रॉड आणि ऑनलाइन सुरक्षित व्यवहाराबाबत मार्गदर्शन करताना विद्यार्थिनी.

भालोद येथे School of Computer Sciences च्या विद्यार्थिनींचा सायबर सुरक्षा उपक्रम; OTP, PIN, पासवर्ड व बँकिंग माहिती सुरक्षित ठेवण्याबाबत महिलांना महत्त्वपूर्ण सूचना.

 कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील School of Computer Sciences विभागाच्या वतीने भालोद येथे बचत गटातील महिलांसाठी सायबर सुरक्षा विषयावर जनजागृतीपर मार्गदर्शन करण्यात आले.

या उपक्रमात विद्यार्थिनी टीना पाटील आणि दर्शना चौधरी यांनी महिलांना सायबर सुरक्षा म्हणजे काय, इंटरनेट व मोबाईलचा सुरक्षित वापर कसा करावा आणि ऑनलाइन फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, याबाबत सोप्या भाषेत माहिती दिली.

OTP, KYC फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन

मार्गदर्शनादरम्यान महिलांना सध्या मोठ्या प्रमाणात घडणाऱ्या विविध सायबर फसवणुकींची उदाहरणे देण्यात आली. OTP Fraud, KYC Fraud, बनावट फोन कॉल, संशयास्पद लिंक, बनावट मेसेज तसेच वैयक्तिक आणि बँकिंग माहिती मागणारे फोन याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

कोणत्याही अनोळखी व्यक्तीला OTP, PIN, पासवर्ड किंवा बँक खात्याशी संबंधित गोपनीय माहिती देऊ नये, असे आवाहन करण्यात आले. तसेच संशयास्पद लिंकवर क्लिक करण्यापूर्वी त्याची खातरजमा करावी आणि अनोळखी कॉल किंवा मेसेजला प्रतिसाद देताना विशेष काळजी घ्यावी, असा सल्लाही देण्यात आला.

हॅकरच्या मुखवट्याद्वारे प्रात्यक्षिकातून जनजागृती

सायबर फसवणूक करणारे कोणत्या पद्धतींचा वापर करतात, हे महिलांना अधिक प्रभावीपणे समजावे यासाठी विद्यार्थिनींनी हॅकरच्या मुखवट्याचा वापर करून सुमारे ५ ते १० मिनिटांची जनजागृतीपर ॲक्टिव्हिटी घेतली.

प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून फसवणुकीच्या विविध पद्धती आणि त्यापासून बचाव करण्याचे उपाय समजावून सांगण्यात आले. या उपक्रमाला बचत गटातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सुरक्षित ऑनलाइन व्यवहाराचा संदेश

महिलांमध्ये सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता निर्माण करणे, ऑनलाइन व्यवहार सुरक्षितपणे करण्याबाबत माहिती देणे आणि संशयास्पद कॉल, लिंक किंवा मेसेजच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी आवश्यक खबरदारी सांगणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

विद्यार्थिनींच्या या उपक्रमातून “सावध रहा, सुरक्षित रहा आणि सायबर फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करा” असा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!