आदर्श शाळेबाहेरील बेकायदेशीर वृक्षतोड; भुसावळ नगरपरिषदेसमोर उपोषणाचा इशारा

भुसावळमधील आदर्श शाळेबाहेर तीन हिरव्या वृक्षांची कथित बेकायदेशीर कत्तल झाल्याने पर्यावरण संवर्धन व विकास समिती आक्रमक झाली असून दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

आदर्श शाळेबाहेरील वृक्षतोडीमुळे भुसावळमध्ये संतापाची लाट. पर्यावरण संवर्धन समिती आक्रमक; कारवाई न झाल्यास उपोषणाची चेतावणी.

भुसावळ शहरातील आदर्श शाळेबाहेर असलेल्या तीन मोठ्या हिरव्यागार वृक्षांची विनापरवाना कत्तल केल्याप्रकरणी ‘पर्यावरण संवर्धन व विकास समिती’ आक्रमक झाली आहे. या बेकायदेशीर वृक्षतोडीबाबत संबंधित शाळा प्रशासन व दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अन्यथा २८ मे पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा समितीने मुख्याधिकारी व प्रभारी नगराध्यक्षांना निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, भरदिवसा कोणतीही अधिकृत परवानगी न घेता ही वृक्षतोड करण्यात आली. ‘महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचे जतन अधिनियम १९७५’ मधील कलम ८ चे हे थेट उल्लंघन आहे. नगरपरिषदेचे अधिकारी श्री. धनराज बाविस्कर यांनीही या वृक्षतोडीसाठी कोणतीही परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

समितीच्या वतीने खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत:

* संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, संस्थाचालक आणि वृक्षतोड करणाऱ्यांवर तात्काळ FIR दाखल करावा.

* २७ मे २०२६ पर्यंत प्रशासनाने ठोस कारवाई करावी.

* कारवाई न झाल्यास २८ मे रोजी सकाळी ११ वाजेपासून नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल.

या निवेदनावर पर्यावरण संवर्धन व विकास समितीचे जळगाव जिल्हाध्यक्ष देवेंद्र वराडे (अप्पा), तालुकाध्यक्ष पवन नाले, मुरलीधर लोखंडे, शेखर धांडे, प्रांजल पाटील तसेच दीपक वाणी, मयूर सुरवाडे यांसह समस्त भुसावळकर नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या प्रकरणामुळे शहरात पर्यावरणाप्रती जागरूक असलेल्या नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!