महा वॉकेथॉन २०२६ : ‘वॉक फॉर वॉटर’च्या माध्यमातून राज्यभर जलसंवर्धनाचा संदेश ;२१ ऑगस्ट जलसंधारण दिनी राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत आयोजन; ‘सेव्ह सॉईल, सेव्ह वॉटर, सिक्युअर टुमारो’ ही यंदाची थीम

२१ ऑगस्ट जलसंधारण दिनी महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांत ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’; ‘Save Soil, Save Water, Secure Tomorrow’चा संदेश.

‘Save Soil, Save Water, Secure Tomorrow’ या थीमसह महाराष्ट्रात महा वॉकेथॉन २०२६. ३६ जिल्ह्यांत ३ किमीपर्यंत वॉक आणि जलसंधारणाची शपथ.

शाश्वत विकासासाठी मृदसंधारण आणि जलसंधारणाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्याच्या मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने २१ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘Save Soil, Save Water, Secure Tomorrow’ ही या उपक्रमाची मुख्य थीम असून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हे घोषवाक्य देण्यात आले आहे.

या उपक्रमांतर्गत नागरिकांनी जास्तीत जास्त ३ किलोमीटरपर्यंत चालत जलसंवर्धनाचा संदेश देणे आणि मृद व जलसंधारणाची शपथ घेणे, असे कार्यक्रमाचे स्वरूप आहे. जलसंवर्धनाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

१५ ते २१ ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताह

शाश्वत विकासासाठी माती आणि पाण्याचे संवर्धन आवश्यक असल्याने १५ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राज्यभर ‘जलसंधारण सप्ताह’ आयोजित करण्यात येत आहे. तसेच १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये ‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येणार आहे.

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी या लोकचळवळीत राज्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

मुंबईत राज्यस्तरीय कार्यक्रम

‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’चा राज्यस्तरीय कार्यक्रम मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील कार्यक्रमाचे आयोजन जिल्हास्तरीय मृद व जलसंधारण समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री, राज्यमंत्री तसेच राज्यसभा, लोकसभा, विधानपरिषद आणि विधानसभा सदस्यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. याशिवाय जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत स्तरावरील लोकप्रतिनिधींचाही सहभाग अपेक्षित आहे.

प्रशासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचारी, डॉक्टर, कलाकार, उद्योजक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू, महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी, एनसीसी, एनएसएस, माय भारत, नेहरू युवा केंद्र, भारत स्काऊट्स अँड गाईड्स, रेड क्रॉस, होमगार्ड, स्वयंसेवी संस्था, रोटरी व लायन्स क्लब, रनिंग व सायकलिंग क्लब, उद्योग-व्यापारी संघटना, CSR भागीदार कंपन्या, क्रीडा संघटना, व्यायामशाळा आणि विविध गुड मॉर्निंग ग्रुप्स यांच्यासह नागरिकांना सहभागी करून घेण्याचे नियोजन आहे.

QR कोडद्वारे ऑनलाइन नोंदणी

महा वॉकेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी QR कोड आधारित ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. २१ ऑगस्ट रोजी आयोजित वॉकेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर प्रथम दहा विजेत्यांना सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.

या उपक्रमाच्या सोशल मीडिया प्रचारासाठी #MahaWalkathon, #WalkForWater आणि #SaveSoilSaveWater या हॅशटॅगचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

युवकांसाठी ‘Reel for Soil and Water Conservation’ स्पर्धा

जलसंधारण सप्ताहाचे औचित्य साधून राज्यातील १५ ते ३० वर्षे वयोगटातील युवक-युवतींसाठी ‘Reel for Soil and Water Conservation’ ही राज्यव्यापी रील स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

इन्स्टाग्रामच्या माध्यमातून माती आणि पाणी संवर्धनाचा संदेश महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचविणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे. स्पर्धेची थीम ‘Save Soil, Save Water, Secure Tomorrow’ अशी आहे.

स्पर्धकांनी ३० ते ६० सेकंदांची Instagram Reel तयार करायची असून रीलच्या सुरुवातीला तिचा उद्देश, स्पर्धकाचे संपूर्ण नाव आणि जिल्ह्याचे नाव नमूद करणे आवश्यक आहे. रील स्वतःच्या Public Instagram Account वर पोस्ट करून मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकृत Instagram Account ला Tag करणे बंधनकारक राहणार आहे.

रील अपलोड करण्याचा कालावधी १५ ते २१ ऑगस्ट २०२६ असा आहे.

रीलसाठी विविध विषय

स्पर्धकांना माती संवर्धन, पाणी बचत, मृदसंधारण, जलसंधारण, मातीची धूप रोखणे, पावसाच्या पाण्याचे संकलन, शेततळे, बंधारे, पाणलोट क्षेत्र विकास, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण, गावातील यशस्वी जलसंधारण कामे, पारंपरिक जलसंधारण पद्धती आणि पाणी वाचविण्याच्या नाविन्यपूर्ण कल्पना अशा विविध विषयांवर रील तयार करता येणार आहे.

Storytelling, Acting, Music, Dance, Animation, AI Creative, Comedy, Short Film, Before-After आणि Drone Visuals यांसारख्या विविध सर्जनशील माध्यमांचा वापर करता येणार आहे. मात्र रीलचा मुख्य संदेश माती आणि पाणी संवर्धनाशी संबंधित असणे आवश्यक आहे.

१०० गुणांचे मूल्यांकन

रील स्पर्धेचे मूल्यांकन पुढीलप्रमाणे करण्यात येणार आहे :

  • विषय व संदेश – ३० गुण
  • कल्पकता – २५ गुण
  • प्रभावी सामाजिक संदेश – २० गुण
  • सादरीकरण व तांत्रिक गुणवत्ता – १५ गुण
  • Instagram Engagement – १० गुण

एकूण – १०० गुण

केवळ Likes किंवा Followersच्या आधारे विजेता निश्चित केला जाणार नसून तज्ज्ञांचे परीक्षण आणि Social Media Engagement यांचा समतोल साधून विजेत्यांची निवड केली जाणार आहे.

प्रत्येक जिल्ह्यात रोख पुरस्कार

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून किमान २५० रील्स आणि राज्यभरातून १० हजार रील्स तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

प्रत्येक जिल्ह्यातील विजेत्यांना प्रस्तावित पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत :

प्रथम पुरस्कार : ₹२५ हजार व गौरवचिन्ह
द्वितीय पुरस्कार : ₹१५ हजार व गौरवचिन्ह
तृतीय पुरस्कार : ₹१० हजार व गौरवचिन्ह

पात्र सहभागींना ई-प्रमाणपत्र देण्यात येणार असून विजेत्यांना ‘युवा मृद-जलदूत’ म्हणून गौरविण्यात येणार आहे.

या अभियानाच्या प्रचारासाठी ‘एक Reel… मातीसाठी! एक Reel… पाण्यासाठी! एक Reel… सुरक्षित भविष्यासाठी!’ हा मुख्य संदेश देण्यात आला आहे.

शाळा-महाविद्यालयांत विविध उपक्रम

१५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या जलसंधारण अभियानाच्या कालावधीत राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

यामध्ये जलसंधारणाचे महत्त्व, पाण्याचे महत्त्व, ‘जल है तो कल है’, जलसंवर्धनाचे उपाय आणि घरातील पाण्याचा वापर यांसारख्या विषयांवर निबंध स्पर्धा, तसेच जलसंवर्धन, पाणी बचत आणि Rainwater Harvesting या विषयांवर चित्रकला व पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत.

याशिवाय ‘जलसंधारण शासनाची जबाबदारी की जनतेची?’ यासह विविध विषयांवर वादविवाद स्पर्धा घेण्यात येणार आहेत.

‘एक शाळा – एक शोषखड्डा’ उपक्रम

जलसंधारण अभियानांतर्गत ‘एक शाळा – एक शोषखड्डा’ हा उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे. विद्यार्थ्यांना पाणी बचतीचे महत्त्व समजावून सांगणे, प्रत्येक शाळेत जलमित्र किंवा जलदूत घोषित करणे, तसेच विद्यार्थ्यांमध्ये जलसंवर्धनाबाबत जागृती निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे.

२१ ऑगस्ट रोजी शाळांमध्ये माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन, मृद व जलसंधारणाची शपथ, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व पुरस्कार वितरणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच गावातील किंवा शहरातील जलतज्ज्ञ व प्रतिष्ठित व्यक्तींना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्याचे नियोजन आहे.

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळा-महाविद्यालयांना आणि उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना २६ जानेवारी २०२७ रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

जलसंवर्धनासाठी लोकसहभागावर भर

मृदसंधारण आणि जलसंधारण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून त्यामध्ये समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग आवश्यक आहे. ‘महा वॉकेथॉन’, रील स्पर्धा, शालेय-महाविद्यालयीन उपक्रम आणि जलसंधारण अभियानाच्या माध्यमातून राज्यभर व्यापक जनजागृती निर्माण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

‘सेव्ह सॉईल, सेव्ह वॉटर, सिक्युअर टुमारो’ या संदेशातून माती आणि पाणी वाचविण्याबरोबरच भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षित आणि शाश्वत पर्यावरण निर्माण करण्याचा संकल्प या अभियानातून करण्यात येत आहे.

अधिकृत सोशल मीडिया खाती

Instagram: @mahawalkathon2026
Facebook: MahaWalkathon2026
X (Twitter): @MahaWalkathon26

संकलन : गजानन पाटील, विभागीय संपर्क अधिकारी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!