‘कितीही फाइव्ह-जी, सिक्स-जी येऊ द्या, गुरुजींशिवाय पर्याय नाही!’; शिक्षकांनी ‘भविष्याचे शिल्पकार’ व्हावे : गुलाबराव पाटील ;जिल्हा शिक्षक पुरस्कार सोहळ्यात १५ शिक्षकांचा गौरव; बदलत्या काळानुसार अद्ययावत राहून गुणवत्तापूर्ण व संस्कारक्षम पिढी घडविण्याचे आवाहन

शिक्षक दिनानिमित्त जळगाव येथे जिल्ह्यातील १५ गुणवंत शिक्षकांचा सन्मान; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे शिक्षकांना ‘भविष्याचे शिल्पकार’ बनण्याचे आवाहन.

‘कितीही फाइव्ह-जी, सिक्स-जी येऊ द्या, गुरुजींशिवाय पर्याय नाही!’ गुलाबराव पाटील यांचा संदेश; निपुण भारत उपक्रमासह शिक्षण क्षेत्रातील प्रगतीवर चर्चा.

 शिक्षक हे केवळ विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकविणारे नसून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारे, आत्मविश्वास निर्माण करणारे आणि जीवनाला योग्य दिशा देणारे मार्गदर्शक आहेत. तंत्रज्ञानामुळे माहिती सहज उपलब्ध होत असली, तरी विद्यार्थ्यांना प्रेरणा, संस्कार आणि माणुसकीची शिकवण देण्याचे महत्त्वाचे कार्य शिक्षकच प्रभावीपणे करू शकतात. त्यामुळे शिक्षकांनी केवळ अध्यापनापुरते मर्यादित न राहता ‘भविष्याचे शिल्पकार’ बनावे, असे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या वतीने जळगाव येथील भैयासाहेब गंधे हॉल, ला. ना. हायस्कूल येथे आयोजित जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी जिल्ह्यात उल्लेखनीय शैक्षणिक कार्य करणाऱ्या १५ शिक्षकांचा जिल्हा शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

‘पटसंख्या आणि गुणवत्ता हेच शाळेचे वैभव’

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, शाळांची पटसंख्या वाढणे, विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती टिकून राहणे आणि शैक्षणिक गुणवत्ता उंचावणे हेच शाळेचे खरे वैभव आहे. काळ झपाट्याने बदलत असून तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही सातत्याने नवनवीन बदल होत आहेत. मात्र, “कितीही फाइव्ह-जी, सिक्स-जी येऊ द्या, गुरुजींशिवाय पर्याय नाही!” असे सांगत त्यांनी शिक्षकांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले.

शिक्षकांनी बदलत्या काळानुसार स्वतःला अद्ययावत ठेवत आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करावा आणि त्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, मूल्ये व सामाजिक जाणीव निर्माण करावी, असे आवाहन त्यांनी केले. गुणवत्तापूर्ण आणि संस्कारक्षम पिढी घडविण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवर असल्याचेही त्यांनी नमूद केले.

जिल्हा शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांची बंद असलेली आगाऊ वेतनवाढ पुन्हा सुरू करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्याचे आश्वासनही गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिले.

शिक्षणात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढतोय

आमदार अनिल पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढत असून त्यामुळे शिक्षणाच्या पद्धतीत मोठे बदल होत असल्याचे सांगितले. तंत्रज्ञानाचा वापर करताना शिक्षकांची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार आहे. पालक मोठ्या विश्वासाने आपली मुले शिक्षकांच्या स्वाधीन करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना सक्षम, जबाबदार आणि संस्कारक्षम नागरिक बनविण्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत मोलाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आमदार राजूमामा भोळे यांनी पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे अभिनंदन केले. शिक्षक ही केवळ नोकरी नसून समाज आणि भावी पिढीप्रती असलेली मोठी जबाबदारी आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांनीही पुरस्कारप्राप्त शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.

‘निपुण भारत’ उपक्रमातून शैक्षणिक गुणवत्तेला चालना

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे यांनी जिल्ह्यात शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्या विशेष प्रयत्नांतून ‘निपुण भारत’ उपक्रमात जिल्हा परिषदेच्या शाळांची होत असलेली प्रगती त्यांनी यावेळी स्पष्ट केली.

पुरस्कारप्राप्त शिक्षक गिरीश महाजन आणि मनीषा शिरसाठ यांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपले मनोगत व्यक्त केले.

जिल्ह्यातील १५ शिक्षकांचा सन्मान

जिल्हा शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या शिक्षकांमध्ये योगेश्वर पाटील (आटोळे, ता. अमळनेर), विलास माळी (महिंदळे, ता. भडगाव), ईश्वर मंडावरे (येवती, ता. बोदवड), नीलेश पाटील (महादेव माळ, ता. भुसावळ), प्रभाबाई पाटील (गणेशपूर, ता. चाळीसगाव), हरि बाविस्कर (कुरवेल तावसे बु., ता. चोपडा), मनीषा शिरसाठ (पाळधी बुद्रुक, ता. धरणगाव), सोनाली बोरसे (आडगाव, ता. एरंडोल), मनीषा मारकड (भोकर, ता. जळगाव), जुगलकिशोर ढाकरे (रांजणी, ता. जामनेर), नीता काकर (घोडसगाव पुनर्वसन, ता. मुक्ताईनगर), संजू राठोड (नाचणखेडा, ता. पाचोरा), स्मिता देसले (कराडी, ता. पारोळा), दीपक कोडे (कुसुंबे, ता. रावेर) आणि गिरीश महाजन (हिंगोणे, ता. रावेर) यांचा समावेश आहे.

मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमाला आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, आमदार अनिल पाटील, आमदार राजूमामा भोळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे, माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश पाटील, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र चौधरी, विजय सरोदे, सर्व गटशिक्षणाधिकारी, पुरस्कारप्राप्त शिक्षक, त्यांचे कुटुंबीय, शिक्षणप्रेमी तसेच शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक नाना पाटील यांनी केले, तर उपशिक्षणाधिकारी विजय सरोदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

एकूणच, शिक्षक दिनाच्या निमित्ताने आयोजित या पुरस्कार सोहळ्यात जिल्ह्यातील गुणवंत शिक्षकांचा सन्मान करून त्यांच्या शैक्षणिक योगदानाची दखल घेण्यात आली. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात आधुनिक साधनांचा स्वीकार करताना विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानासोबतच संस्कार, मूल्ये आणि माणुसकी रुजविण्याचे आवाहन या कार्यक्रमातून करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!